Mysterious Red Dots | अंतराळातील रहस्यमय ‘लहान लाल ठिपके’ म्हणजे महाकाय तारे? 
विश्वसंचार

Mysterious Red Dots | अंतराळातील रहस्यमय ‘लहान लाल ठिपके’ म्हणजे महाकाय तारे?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने अंतराळात शोधलेल्या रहस्यमय ‘लहान लाल ठिपक्यांनी’ खगोलशास्त्रज्ञांमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. आतापर्यंत हे ठिपके म्हणजे ‘ब्लॅक होल्स’ (कृष्णविवर) असावेत असा अंदाज होता; परंतु एका नवीन संशोधनाने हा जुना सिद्धांत मोडीत काढला आहे. हार्वर्ड आणि स्मिथसोनियन सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या संशोधकांनी असा प्रस्ताव मांडला आहे की, हे लाल ठिपके म्हणजे प्रत्यक्षात विश्वातील पहिल्या पिढीतील महाकाय ‘सुपरमॅसिव्ह’ तारे असू शकतात, जे आता कृष्णविवरात रूपांतरित होण्याच्या अंतिम टप्प्यावर आहेत.

जर हा नवा सिद्धांत खरा ठरला, तर यापूर्वीचा ‘सक्रिय दीर्घिका केंद्र’ (Active Galactic Nuclei) आणि ब्लॅक होलचा सिद्धांत बदलला जाऊ शकतो. सुरुवातीच्या विश्वात पहिल्या तार्‍यांची आणि कृष्णविवरांची निर्मिती कशी झाली, हे समजून घेण्यासाठी या शोधामुळे एक नवी द़ृष्टी मिळणार आहे. देवेश नंदल आणि अवी लोएब यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ‘MoM- BH-1’ आणि ‘द क्लिफ’ नावाच्या दोन लाल ठिपक्यांचा अभ्यास केला. हे ठिपके अनुक्रमे ‘बिग बँग’नंतर 65 कोटी आणि 180 कोटी वर्षांनी अस्तित्वात आलेले आहेत.

संशोधकांनी विकसित केलेल्या मॉडेलनुसार, या तार्‍यांची प्रचंड चमक आणि त्यांच्या स्पेक्ट्रममधील वैशिष्ट्यपूर्ण ‘V-आकार’, हे धूलिकणांमुळे नसून तार्‍यांच्या स्वतःच्या वातावरणामुळे निर्माण झाले असावेत. हे तारे अत्यंत शुद्ध आणि धातूविरहित स्वरूपाचे असून ते आकाराने इतके अवाढव्य आहेत की त्यांना ‘मॉन्स्टर स्टार्स’ संबोधले जात आहे. जेम्स वेब टेलिस्कोपच्या सर्वेक्षणातून हे रहस्यमय ठिपके समोर आले आहेत. या नवीन सिद्धांतामुळे विश्वाच्या उत्पत्तीच्या सुरुवातीच्या काळातील गूढ उकलण्यास मदत होईल. हे ‘लाल ठिपके’ खरोखरच मृत्यूच्या उंबरठ्यावरील तारे आहेत की कृष्णविवर, हे अधिक निरीक्षणांनंतर स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT