लिमा : पेरूच्या पूर्वेकडील सपाट जंगलात एक भव्य, पिरॅमिडसारखी डोंगररचना ‘सेरो एल कोनो’ असून ती 400 मीटर (1,310 फूट) उंचीची आहे. या डोंगररचनेचं वैशिष्ट्य म्हणजे तिचं भोवतालच्या प्रदेशापेक्षा वेगळं, एकटं उभं राहणं आणि तिचा त्रिकोणी आकार. स्वच्छ हवामानात ही रचना पेरूच्या अँडीज पर्वतरांगांपासून तब्बल 400 किमी दूरून देखील दिसते.
‘सेरो एल कोनो’ म्हणजे स्पॅनिश भाषेत ‘कोन डोंगर’. ही रचना पेरू आणि ब्राझीलच्या सीमेवर असलेल्या सिएरा डेल डिव्हिसर नावाच्या डोंगराळ भागात आहे. आसपासच्या पर्वतरांगांच्या पार्श्वभूमीवर ही रचना अनेक छायाचित्रांमध्ये स्पष्टपणे दिसते, परंतु इतर शिखरांपासून ती थोडी वेगळी व लांब असल्यामुळे तिचा विशिष्ट आकार अधिक उठून दिसतो. या अजब रचनेचं मूळ अजूनही एक रहस्य आहे, कारण हे ठिकाण फारच दुर्गम आहे.
काही वैज्ञानिकांचा असा अंदाज आहे की ही रचना कदाचित एक जुना, निष्क्रिय ज्वालामुखी असू शकते, तर इतर काहींच्या मते हा फक्त एक असामान्य खडकांचा समूह असावा. मात्र, स्थानिक आदिवासींच्या मते या डोंगराचा एक वेगळाच आध्यात्मिक अर्थ आहे. ला रेपब्लिका या पेरूतील वृत्तपत्रानुसार, सेरो एल कोनो हे स्थानिक जमातींसाठी एक पवित्र आत्मा किंवा ‘अंदीयन अपु‘ म्हणजेच पर्वतदेवता आहे.
पेरू, बोलिव्हिया आणि इक्वाडोरमधील पौराणिक कथांनुसार, हे अपु जमिनीपासून उगम पावले आणि जवळ राहणार्या लोकांचे मार्गदर्शन व संरक्षण करण्याचं कार्य करत होते. एक चौथी, अजूनही कोणताही पुरावा नसलेली कल्पना अशीही आहे की सेरो एल कोनो हा खरेतर प्राचीन आदिवासी जमातींनी बांधलेल्या एखाद्या पिरॅमिडच्या अवशेषांवर उभा असावा. ही अद्वितीय रचना वैज्ञानिक, इतिहासतज्ज्ञ आणि अध्यात्मिक परंपरांचा अभ्यास करणार्यांसाठी एक गूढ आणि आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे.