लिमा : अॅन्डीज पर्वताच्या उंच भागात असलेल्या सुमारे 5,200 खड्ड्यांच्या एका रहस्यमय इंका-युगातील स्मारकाबाबत एका नवीन अभ्यासात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. शेकडो वर्षांपूर्वी हे ठिकाण वस्तू विनिमय आणि हिशेब ठेवण्यासाठी वापरले जात असावे, असे या अभ्यासातून सुचवले जात आहे.
दक्षिण पेरूच्या अॅन्डीजमधील मोंटे सिएर्पे (सर्प पर्वत) नावाच्या पर्वतावर हे खड्डे सुव्यवस्थित जाळीदार रचनेत खोदलेले आहेत. या अभ्यासानुसार, इ. स. 1000 ते 1400 या काळात 1,00,000 हून अधिक लोकसंख्या असलेल्या शक्तिशाली चीनच्या राजवटीत हे ठिकाण वस्तूंच्या देवाण-घेवाणीचे ठिकाण म्हणून बांधले गेले असावे. 15 व्या शतकात इंका साम—ाज्याने जेव्हा चीनचा राज्याला जिंकले, तेव्हा हे ‘खड्ड्यांची पट्टी’ असलेले ठिकाण स्थानिक समूहांकडून खंडणी आणि कर गोळा करण्यासाठी वापरले गेले असावे, असे लेखकांनी सुचवले आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडाचे मानववंशशास्त्रज्ञ आणि अभ्यासाचे सह-लेखक चार्ल्स स्टॅनिश यांनी सांगितले की, पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी या हजारो खड्ड्यांचे विश्लेषण ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून केले. या तंत्रज्ञानामुळे त्यांना ‘खड्ड्यांच्या मांडणीत गणिताची नमुना रचना’ आढळून आली. याचा अर्थ, हे खड्डे त्यावेळच्या हिशेब आणि रेकॉर्ड ठेवण्याच्या पद्धतीप्रमाणे विभाग आणि ब्लॉक्समध्ये आयोजित केले गेले होते. मोंटे सिएर्पेवरील हे रहस्यमय खड्डे एका लांब पट्टीत मांडलेले आहेत, जे अनेक छोट्या-छोट्या गटांमध्ये विभागलेले आहेत. या संपूर्ण पट्ट्याची लांबी 0.9 मैल (1.5 किलोमीटर) आहे.
प्रत्येक खड्डा 3 ते 6 फूट (1 ते 2 मीटर) रुंद असून, 3 फूट (1 मीटर) पर्यंत खोल आहे आणि काही खड्ड्यांमध्ये दगडांचे अस्तरही आहे. हे ठिकाण 16 व्या शतकातील स्पॅनिश वसाहतीकरणापूर्वीच्या रस्त्यांच्या छेदनबिंदूजवळ आणि एका संरक्षण वस्तीजवळ स्थित आहे. सिडनी विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि अभ्यासाचे सह-लेखक जैकब बोंगर्स यांच्या मते, या खड्ड्यांच्या प्रचंड संख्येवरून अनेक वर्षांपासून अनेक वेगवेगळ्या कल्पना मांडल्या गेल्या आहेत : ‘मोंटे सिएर्पेच्या उद्देशाबद्दलच्या गृहितकांमध्ये संरक्षण, साठवणूक, हिशेब तसेच पाणी संकलन, धुके जमा करणे आणि बागकाम यांचा समावेश आहे. या ठिकाणाचे कार्य अजूनही अस्पष्ट आहे.’