mysterious molecule Pluto Titan 
विश्वसंचार

Mysterious Molecular Existence | ‘प्लूटो’, ‘टायटन’वर आढळले अनाकलनीय रेणूचे अस्तित्व

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या अत्याधुनिक ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ने अंतराळातील एका मोठ्या रहस्याचा छडा लावला आहे. आपल्या सूर्यमालेतील बटु ग्रह ‘प्लूटो’ आणि शनीचा महाकाय चंद्र ‘टायटन’ यांच्यावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशातील एक विशिष्ट तरंगलांबी गायब असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. या धक्कादायक शोधामुळे या दोन्ही खगोलीय घटकांवर एका अशा अज्ञात रेणूचे अस्तित्व असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, जो आतापर्यंत सूर्यमालेतील किंवा सूर्यमालेबाहेरील कोणत्याही ग्रहावर आढळलेला नाही.

विश्वभरातील प्रत्येक मूलद्रव्य किंवा रेणू विद्युतचुंबकीय प्रारणांची एक विशिष्ट तरंगलांबी शोषून घेतो. याच गुणधर्माचा वापर करून खगोलशास्त्रज्ञ दूरवरच्या ग्रहांचा अभ्यास करतात. जेव्हा एखाद्या ग्रहावरून प्रकाश परावर्तित होतो, तेव्हा शास्त्रज्ञ त्या प्रकाशाचे बारकाईने विश्लेषण करतात आणि तिथे असणाऱ्या गडद ‘ऑब्झॉर्प्शन लाईन्स' (प्रकाशाच्या शोषलेल्या रेषा) शोधतात. या रेषांवरून तिथे कोणत्या रासायनिक संयुगांचे अस्तित्व आहे, हे ओळखता येते.

उदाहरणादाखल सांगायचे, तर ऑक्सिजनचा रेणू २३० नॅनोमीटरवर प्रकाश शोषून घेतो. त्यामुळे २०२१ मधील एका अभ्यासानुसार, जर एखाद्या दूरच्या ग्रहाच्या विद्युतचुंबकीय वर्णपटात या फ्रिक्वेन्सीवर ‘ऑब्झॉर्प्शन लाईन’ दिसली, तर संशोधक खात्रीने सांगू शकतात की, तिथल्या वातावरणात ऑक्सिजन आहे. जेम्स वेब टेलिस्कोप अशा प्रकारच्या वर्णपटांचे अचूक नमुने घेण्यात आणि परग्रहांच्या वातावरणातील, दूरच्या ताऱ्यांमधील तसेच प्राचीन दीर्घिकांमधील विशिष्ट रसायने ओळखण्यात अत्यंत पटाईत ठरला आहे.

अगदी अलीकडेच त्याने एका परग्रहावर अशा एका रेणूचा शोध लावला होता, जो परग्रहवासीयांच्या अस्तित्वाकडे संकेत करतो. 'arXiv' या प्रीप्रिंट सर्व्हरवर ११ जून रोजी अपलोड करण्यात आलेल्या एका नवीन संशोधन अहवालात, संशोधकांनी प्लूटो आणि टायटन संदर्भातील जेम्स वेबच्या डेटाचे विश्लेषण केले आहे. यामध्ये त्यांनी आतापर्यंत फारशा न अभ्यासलेल्या अतिशय सूक्ष्म तरंगलांबींवर लक्ष केंद्रित केले होते. या अभ्यासादरम्यान दोन्ही खगोलीय घटकांच्या वर्णपटात अंदाजे ५.११ मायक्रोमीटरवर एक विशिष्ट ‘ऑब्झॉर्प्शन लाईन’ आढळून आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT