वॉशिंग्टन : मानववंशाच्या इतिहासात अत्यंत लहान शरीररचनेमुळे ‘हॉबिट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आता नामशेष झालेल्या आपल्या पूर्वज प्रजातीबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. या प्रजातीची शरीररचना आधीच्या अंदाजापेक्षा मानवाशी अधिक मिळतीजुळती होती आणि ते अगदी सरळ उभे राहून संथ गतीने चालत असावेत, असे त्यांच्या नितंबाच्या हाडांचा अभ्यास करणाऱ्या मानववंशशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.
मात्र, आधुनिक मानवाच्या तुलनेत त्यांची चालण्याची पद्धत काहीशी प्राथमिक स्वरूपाची होती. तसेच शिकार करणे आणि अन्न शिजवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे ही प्रजाती आपल्या म्हणजेच ‘होमो सेपियन्स’पेक्षा अजूनही बरीच वेगळी ठरते. या नवीन शोधामुळे हॉबिटस्च्या उत्पत्तीचे गूढ उकलण्याऐवजी अधिकच गडद झाले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाच्या बायोलॉजिकल अँथ्रोपोलॉजिस्ट क्रिस्टी ल्युटन यांनी सांगितले, ‘‘केवळ नितंबाच्या हाडांचा विचार केला, तर ‘होमो फ्लोरेसिएन्सिस’ (Homo floresiensis) ही प्रजाती सामान्यतः मानवांसारखी आणि ‘होमो’ वंशातील इतर प्रजातींसारखीच दिसते. ते मानवासारखेच चालत असावेत.
’’ त्या पुढे म्हणाल्या, ‘‘पण ‘होमो फ्लोरेसिएन्सिस’ ही प्रजाती खूप वेगाने चालणारी किंवा लांबचा प्रवास करणारी नव्हती.’’ ल्युटन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंडोनेशियन बेट ‘फ्लोरेस’वर सापडलेल्या ‘LB 1’ या प्रौढ महिला हॉबिटच्या श्रोणिच्या (Pelvic) हाडांचा बारकाईने अभ्यास केला. ही महिला साधारण १००,००० ते ६०,००० वर्षांपूर्वी मृत पावली असावी आणि तिची उंची सुमारे ३.५ फूट (१ मीटर) होती. ही हॉबिट प्रजाती प्लिस्टोसीन काळातील इतर मानवी प्रजातींशी अधिक जवळीक साधणारी होती की ‘ल्युसी’सारख्या प्राचीन ‘ऑस्ट्रॅलोपिथेसिन’ प्रजातींशी मिळतीजुळती होती, याचा शोध संशोधकांनी घेतला. हा अभ्यास २५ ऑगस्ट रोजी ‘अमेरिकन जर्नल ऑफ बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी’मध्ये प्रकाशित झाला आहे.
२००३ मध्ये ‘होमो फ्लोरेसिएन्सिस’चा शोध लागल्यापासून, ही प्रजाती आकाराने एवढी लहान का होती आणि ती नेमकी कोणत्या प्रजातीपासून विकसित झाली, याचा शोध संशोधक घेत आहेत. हॉबिटस्च्या सांगड्यामध्ये मानवी लक्षणे आणि प्राचीन ऑस्ट्रॅलोपिथेसिनच्या लक्षणांचे एक अनोखे मिश्रण पाहायला मिळते. त्यामुळे त्यांच्या उत्क्रांतीचा आणि पूर्वजांचा मार्ग शोधणे कठीण झाले आहे. उदाहरणार्थ, हॉबिटस्च्या हाताची हाडे ही प्राचीन ‘ऑस्ट्रॅलोपिथेसिन’शी अधिक जुळणारी आहेत, तर त्यांचे खांदे आणि हाताचा वरचा भाग मात्र आधुनिक मानवाशी अधिक साधर्म्य दाखवतो.