विश्वसंचार

प्रारंभिक आकाशगंगांमध्ये रहस्यमय जड घटक

Arun Patil

वॉशिंग्टन : 'नासा'च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने आतापर्यंत अनेक प्रकारची महत्त्वाची संशोधने केलेली आहेत. अगदी सुरुवातीच्या काळातील आकाशगंगा, ग्रह-तार्‍यांचाही या अंतराळ दुर्बिणीने शोध लावला आहे. आपल्या ब्रह्मांडातील काही 'नवजात' आकाशगंगांचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास अब्जावधी वर्षांचा वेळ लागतो. ब्रह्मांडाच्या निर्मितीनंतर पहिल्या दोन ते तीन अब्ज वर्षांपूर्वी बनलेल्या आकाशगंगांबाबत आता जेम्स वेब दुर्बिणीने महत्त्वाच निरीक्षण नोंदवले आहे. त्यांच्यामध्ये तुलनेने अधिक जड घटक समाविष्ट असल्याचे दिसून आले आहे.

नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतील अ‍ॅस्ट्रोफिजीसिस्टनी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या डाटाचा अभ्यास करून याबाबत संशोधन केले आहे. ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या काळातील अशा 'किशोरवयीन' आकाशगंगांच्या अभ्यासावरून त्यांचा विकास कसा घडला हे समजू शकते. 'बिग बँग' या महाविस्फोटानंतर ब्रह्मांडाची निर्मिती झाली असे म्हटले जाते.

त्यानंतर केवळ दोन ते तीन अब्ज वर्षांनंतर अशा आकाशगंगांची निर्मिती झाली. त्यांचे निरीक्षण अनेक थक्क करणार्‍या गोष्टी दर्शवणारे आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स' मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आकाशगंगांमधील तापमान, वायुंची रासायनिक रचना अनोखी आहे. अशा आकाशगंगांमध्ये तुलनेने अधिक जड घटक असल्याचे दिसून आले.

SCROLL FOR NEXT