Rare Ocean Fish | पारदर्शक डोके, चमकणारे हिरवे डोळे असलेला मासा 
विश्वसंचार

Rare Ocean Fish | पारदर्शक डोके, चमकणारे हिरवे डोळे असलेला मासा

पुढारी वृत्तसेवा

लंडन : विज्ञानाच्या पुस्तकातून किंवा एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटातून बाहेर पडावा असा भासणारा, पूर्णपणे पारदर्शक डोके आणि आतून चमकणारे हिरवे डोळे असलेला अत्यंत दुर्मीळ ‘बॅरेलआय’ (Macropinna microstoma) हा मासा नेहमीच संशोधकांचे लक्ष वेधून घेतो. हा मासा समुद्राच्या अशा भागात राहतो जिथे सूर्याचा प्रकाश सहसा पोहोचत नाही. समुद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे ६०० ते ८०० मीटर (२००० ते २६०० फूट) खाली असणाऱ्या ‘ट्वाइलाईट झोन’ म्हणजेच अंधाऱ्या क्षेत्रात हा जीव वावरतो. हा भाग अत्यंत अंधाऱ्या वातावरणाचा मानला जातो.

या माशाचे डोके काचेच्या किंवा पाण्याचा फुगा असलेल्या एका घुमटासारखे पूर्णपणे पारदर्शक असते. या पारदर्शक आवरणाखाली त्याचे दोन नळीच्या आकाराचे हिरवे डोळे स्पष्टपणे दिसतात. या माशाचे डोळे अत्यंत प्रकाश-संवेदनशील असतात. सुरुवातीला वैज्ञानिकांचा असा समज होता की, याचे डोळे नेहमी वरच्या दिशेलाच स्थिर असतात. परंतु, संशोधनात असे समोर आले की, हा मासा गरज पडेल तसे आपले डोळे वरून पुढे फिरवू शकतो. हा मासा आपले डोळे वर करून समुद्राच्या वरच्या थरातून पोहत जाणाऱ्या भक्ष्यांची सावली टिपतो. भक्ष्याचा माग लागल्यावर तो आपले डोळे पुढे सरकवून अचूक शिकार करतो. या माशाचे पारदर्शक डोके केवळ पाहाण्यासाठीच नाही, तर त्याच्या नाजूक डोळ्यांचे शिकारी प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी एक सुरक्षा कवच म्हणूनही काम करते.

हा मासा प्रामुख्याने ज्युप्लँक्टन (Zooplankton) आणि लहान कीटक खाऊन जगतो. समुद्राच्या तळाशी प्रचंड दाब आणि अंधार असल्यामुळे या माशाचा जिवंत अभ्यास करणे अत्यंत कठीण असते. पाण्याच्या दाबातील बदलांमुळे पृष्ठभागावर येताच या नाजूक माशाचे शरीर नष्ट होण्याची शक्यता असते. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि रिमोटली ऑपरेटेड वाहनांच्या (ROVs) साहाय्याने वैज्ञानिकांना या दुर्मीळ जीवाचे हाय-डेफिनिशन चित्रीकरण करण्यात यश आले आहे. अथांग समुद्राच्या पोटात लपलेले हे जीव सृष्टीच्या अफाट सौंदर्याची आणि उत्क्रांतीच्या विविधतेची साक्ष देतात. ‘बॅरेलआय’सारखे जीव मानवाला अंतराळातील एखाद्या एलियनसारखे भासत असले, तरी ते आपल्याच पृथ्वीवरील एक गूढ वास्तव आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT