वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’च्या क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळ ग्रहावरून पाठवलेल्या एका नवीन छायाचित्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मंगळावरील एका टेकडीच्या खडकामध्ये आयताकृती दरवाजासारखी पोकळी स्पष्टपणे दिसत असून, तेथे परग्रहवासीयांची किंवा एखाद्या प्राचीन संस्कृतीची उपस्थिती असावी, असा दावा एलियन संशोधकांनी केला आहे.
क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळावरील माऊंट शार्प परिसरातील गेल क्रेटर भागाचा शोध घेत असताना मास्टकॅमद्वारे काढलेल्या हाय-रिझोल्यूशन पॅनोरमा प्रतिमेमध्ये हा गूढ आकार कॅप्चर झाला आहे. टेकडीच्या खडकात एक गडद, आयताकृती प्रवेशद्वार तयार झाल्यासारखे दिसते. यूएफओ संशोधक स्कॉट सी. वारिंग यांच्या मते, हे मानवनिर्मित किंवा एलियन्सने तयार केलेले दरवाजासारखे प्रवेशद्वार असू शकते. हे साधारणपणे ६.६ फूट उंच आणि ३.३ फूट रुंद असावे, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, हा कोणत्याही परग्रहवासीयांच्या घराचा दरवाजा नसून हा केवळ एक नैसर्गिक भौगोलिक बदल आहे. मंगळावरील खडकांमध्ये झालेल्या नैसर्गिक भेगा, तीव्र वारे आणि धूप यामुळे खडकाचा काही भाग तुटून पडला आहे. खोल पडलेल्या सावलीमुळे आणि कॅमेऱ्याच्या कोनामुळे तो भाग उघड्या दरवाजासारखा भासतो. मानवी मेंदूला कोणत्याही अस्पष्ट आकृतीमध्ये ओळखीचे आकार (जसे की मानवी चेहरे, प्राणी किंवा दरवाजे) शोधण्याची नैसर्गिक सवय असते, ज्याला मानसशास्त्रात ‘पॅरेडोलिया’ म्हणतात.
‘नासा’ने यापूर्वी मे २०२२ मध्येदेखील अशाच एका ‘दरवाजा’सारख्या आकृतीचे फोटो जारी केले होते. सुरुवातीला त्यावरूनही मोठे दावे झाले होते; परंतु नंतर बारकाईने तपास केला असता, ती केवळ ३० सेमी (१२ इंच) उंच खडकाची एक लहानशी नैसर्गिक भेग असल्याचे सिद्ध झाले होते. सध्या ‘नासा’ने या नव्या प्रतिमेवर अधिकृत वक्तव्य दिलेले नसले, तरी शास्त्रज्ञांच्या मते, मंगळावर जीवसृष्टी किंवा प्रगत संस्कृती असल्याचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत.