Jagannath Temple Puri | पुरीच्या जगन्नाथ मंदिर शिखरावर दिसला रहस्यमयी जीव!  
विश्वसंचार

Jagannath Temple Puri | पुरीच्या जगन्नाथ मंदिर शिखरावर दिसला रहस्यमयी जीव!

पुढारी वृत्तसेवा

पुरी : येथील विश्वप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर एक रहस्यमयी जीव दिसून आल्याने भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये कमालीचे कुतूहल आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ही घटना गुरुवारी ‘जलक्रीडा एकादशी’च्या मुहूर्तावर घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या वरच्या भागात असलेल्या ‘दधी नऊती’ क्षेत्राजवळ एक जीव फिरताना दिसला. त्याच वेळी मंदिराचे ‘छुनारा सेवाधारी’ (सेवायत) महादीप प्रज्वलित करण्यासाठी शिखरावर पोहोचले होते. सेवाधाऱ्यांची नजर या जीवावर पडताच त्यांनी तातडीने याची माहिती खाली इतर लोकांना दिली. पाहता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि चर्चेचा विषय बनली. प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, तो प्राणी मंदिराच्या उंच संरचनेवर अतिशय सहजतेने इकडे-तिकडे फिरत होता. त्यानंतर सेवाधाऱ्यांनी सतर्कता दाखवत त्या जीवाला सुरक्षितपणे पकडले आणि मंदिर परिसराच्या बाहेर सोडून दिले.

सुदैवाने या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. जरी या प्राण्याची अधिकृत ओळख अद्याप पटलेली नसली, तरी स्थानिक लोकांच्या मते तो ‘सालिया पटानी’ नावाचा ‘सिव्हेट’ (Civet - मांजर प्रजातीतील प्राणी) असू शकतो. हा एक निशाचर सस्तन प्राणी असून, तो ओडिशामधील विविध भागांत आढळतो. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, हा प्राणी श्री जगन्नाथ मंदिराच्या इतक्या उंच भागापर्यंत पोहोचला कसा? काही लोकांचा असा अंदाज आहे की, तो प्राणी बऱ्याच काळापासून मंदिराच्या वरच्या भागात कुठेतरी लपून राहत असावा. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी पुरी येथील एका शॉपिंग मॉलमध्येही असाच एक अज्ञात जीव दिसल्याची बातमी समोर आली होती. मात्र, या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणावर श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाकडून अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT