शिलाँग : भारतीय वैज्ञानिकांनी ईशान्य भारतातील मेघालयाच्या गारो हिल्समध्ये एका अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यमयी सापाचा शोध लावला आहे. ‘कॅलामिया गारोएन्सिस’ असे या नव्या प्रजातीचे नाव असून, हा साप अनेक वर्षांनंतर संशोधकांच्या नजरेस पडला आहे. दिसायला चमकदार, सडपातळ आणि अंगावर काळ्या पट्ट्या असलेला हा साप त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शरीररचनेमुळे चर्चेत आहे.
कॉटन युनिव्हर्सिटी, मिझोरम युनिव्हर्सिटी, आसाम डॉन बॉस्को युनिव्हर्सिटी आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण (ZSI) यांसारख्या नामांकित संस्थांच्या वैज्ञानिकांनी यावर सखोल संशोधन केले आहे. ईशान्य भारतातील जंगलांमध्ये अजूनही जैवविविधतेचा मोठा खजिना दडलेला असल्याचे या संशोधनातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ‘कॅलामिया गारोएन्सिस’ हा साप गायब होण्याच्या कलेत (Camouflage) कुशल आहे. वैज्ञानिक सांगतात की, हा साप तुमच्या अगदी नजरेसमोर असूनही चटकन ओळखू येत नाही. तो स्वतःला परिसराशी जुळवून घेतो किंवा जमिनीतील बिळे, पालापाचोळा आणि मातीमध्ये क्षणात स्वतःला गाडून घेतो. त्याच्या या रंग बदलण्याच्या आणि लपण्याच्या अद्भुत क्षमतेमुळेच त्याचा शोध लागण्यास इतका मोठा काळ जावा लागला. बहुतेक सापांची शेपटी निमुळती आणि टोकदार असते, मात्र ‘कॅलामिया गारोएन्सिस’ची शेपटी तशी नसून ती बोथट आहे.
हे वैशिष्ट्य त्याला इतर सापांपासून वेगळे करते. याशिवाय, त्याच्या शेपटीच्या खालच्या भागावर एक ठळक काळी पट्टी असते. हा एक लहान आणि बिळात राहणारा ‘रीड स्नेक’ प्रकारातील साप आहे. वैज्ञानिकांनी ‘मायटोकॉन्ड्रियल डीएनए’ विश्लेषण आणि शारीरिक अभ्यासाद्वारे हा साप एक वेगळी प्रजाती असल्याची पुष्टी केली आहे. ही प्रजाती मिझोराममध्ये आढळणार्या ‘कॅलामिया मिझोरमेन्सिस’शी मिळतीजुळती असली तरी, जनुकीयद़ृष्ट्या यामध्ये 6.3 टक्के फरक आढळला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सापापासून मानवाला कोणताही धोका नाही. ‘कॅलामिया गारोएन्सिस’ हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. त्यांच्या शरीरात विष निर्माण करणार्या ग्रंथी नसतात. स्वभावाने लाजाळू असलेले हे साप माणसांना पाहताच लपण्याचा प्रयत्न करतात.