Amazon mysterious tribe | अ‍ॅमेझॉनमधील रहस्यमयी जमातीचा व्हिडीओ प्रथमच उजेडात 
विश्वसंचार

Amazon mysterious tribe | अ‍ॅमेझॉनमधील रहस्यमयी जमातीचा व्हिडीओ प्रथमच उजेडात

पुढारी वृत्तसेवा

लिमा : लेखक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते पॉल रोसोलिए यांनी लेक्स फ्रिडमॅन यांच्या पॉडकास्टमध्ये हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये पेरू देशातील अ‍ॅमेझॉन भागात राहणारे माश्को पिरो जमातीचे योद्धे पहिल्यांदाच स्पष्टपणे कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

व्हिडीओमध्ये या जमातीचे सदस्य नदीकाठी हातात भाले आणि धनुष्यबाण घेऊन उभे असलेले दिसतात. त्यांच्याभोवती रंगीबेरंगी फुलपाखरांचा मोठा थवा उडताना दिसतो, जे द़ृश्य अत्यंत विलोभनीय पण तितकेच धक्कादायक आहे. सहसा बाहेरच्या जगाबद्दल आक्रमक असणार्‍या या जमातीने एका प्रसंगात आपली शस्त्रे खाली ठेवली आणि नदीतील बोटीतून दिलेले अन्न स्वीकारले. पॉल रोसोलिए यांच्या मते, या जमातीच्या जीवनशैलीचे इतके जवळून चित्रण यापूर्वी कधीही झाले नव्हते. हे केवळ कुतूहल नाही, तर एक संकट आहे !

तज्ज्ञांच्या मते, हे आदिवासी लोक वारंवार नदीकाठी दिसणे ही आनंदाची बातमी नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे जंगल नष्ट होत आहे. लाकूड कंपन्यांनी जंगलात 200 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते बनवले आहेत, ज्यामुळे या आदिवासींच्या अधिवासात घुसखोरी झाली आहे. अमली पदार्थांच्या तस्करांनीही या दुर्गम भागात आपले जाळे पसरवले असून, त्यामुळे या जमातीला त्यांच्या हक्काच्या जागेतून बाहेर पडावे लागत आहे. बाह्य जगाशी संपर्क आल्यास साध्या ताप किंवा फ्लूसारख्या आजारांमुळे ही संपूर्ण जमात काही महिन्यांतच नष्ट होऊ शकते, कारण त्यांच्या शरीरात आधुनिक आजारांशी लढण्याची प्रतिकारशक्ती नसते.

माश्को पिरो जमातीची वैशिष्ट्ये

जगातील सर्वात मोठा अलिप्त गट : ही जगातील सर्वात मोठी अलिप्त आदिवासी जमात मानली जाते.

संस्कृती : हे लोक आजही शिकार आणि नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहेत. जंगलातील प्राण्यांची हाडे आणि लाकडापासून बनवलेली शस्त्रे ते वापरतात.

इतिहास : 20 व्या शतकाच्या सुरुवातीला रबर उद्योगाच्या क्रूरतेमुळे त्यांनी स्वतःला खोल जंगलात बंदिस्त करून घेतले होते.

पेरू सरकारकडे मागणी : पर्यावरणवाद्यांनी पेरू सरकारकडे मागणी केली आहे की, या जमातीसाठी राखीव असलेल्या क्षेत्राचा विस्तार करावा आणि तिथली वृक्षतोड त्वरित थांबवावी, जेणेकरून ही प्राचीन संस्कृती टिकून राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT