लास वेगास : तंत्रज्ञानाच्या जगात दरवर्षी काहीतरी अजब पाहायला मिळते. यावर्षी लास वेगास येथे सुरू असलेल्या सीईएस 2026 (कझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो) मध्ये एका अशा लॉलीपॉपने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, जी खाताना तुम्हाला कान न लावताही गाणी ऐकू येतात.
लावा कंपनीने तयार केलेल्या या अनोख्या कँडीचे नाव ‘लॉलीपॉप स्टार’ असे आहे. ही लॉलीपॉप चोखताना किंवा खाताना थेट तुमच्या डोक्यात संगीत वाजू लागते. विशेष म्हणजे, तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला काहीही ऐकू येत नाही. या लॉलीपॉपमध्ये बोन कंडक्शन या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. जेव्हा तुम्ही ही लॉलीपॉप खाता, तेव्हा त्यातील व्हायब्रेशन्स (कंपने) तुमच्या जबड्याच्या आणि कवटीच्या हाडांमधून थेट अंतर्कर्णापर्यंत (इनर इअर) पोहोचतात. कंपनीच्या प्रवक्त्या कॅसी लॉरेन्स यांनी सांगितले की, हे एखाद्या माऊथ कॉन्सर्टसारखे आहे.
या लॉलीपॉपमध्ये एकॉन, आईस स्पाईस आणि अरमानी व्हाईट यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांची गाणी सेट केलेली असतील. प्रत्येक फ्लेवरनुसार गाण्याची बीट आणि संगीत वेगवेगळे असणार आहे. एका लॉलीपॉपची किंमत 8.99 डॉलर्स म्हणजेच सुमारे 808 रुपये ठेवण्यात आली आहे. एका साध्या लॉलीपॉपसाठी इतकी मोठी किंमत मोजावी लागत असल्याने सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या ही लॉलीपॉप प्री-लॉन्चमध्ये असून, इच्छुक ग्राहक कंपनीच्या वेबसाईटवर वेटलिस्टमध्ये नोंद करता येणार आहे.