विश्वसंचार

अनेक आजार दूर ठेवण्यासाठी मशरूम गुणकारी

Arun Patil

नवी दिल्ली : मशरूम म्हणजेच आळिंबी ही एक प्रकारची कवक किंवा बुरशी आहे. मशरूमच्या सुमारे 1.5 ते 2 दशलक्ष प्रजाती आहेत. त्यातील सुमारे 300 खाद्य (बिनविषारी) प्रजाती आहेत. त्यातील भारतात नेहमीच्या बाजारपेठेत 4 ते 6 व्यावसायिक पातळीवर उपलब्ध आहेत व ज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मशरूमचे आरोग्यास बरेच सकारात्मक फायदे आहेत असे अनेक संशोधन कार्यातून आढळते. मशरूम जास्त मेद, कॅलरी किंवा सोडियम प्रदान न करता जेवणात मसालेदार चव आणतात. मशरूममध्ये अनेक पोषक घटक असतात व त्यामुळे ते आरोग्यासाठी लाभदायक ठरतात असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मशरूम अँटिऑक्सिडंटस् आणि इतर पोषक तत्त्वांची श्रेणी प्रदान करतात जे त्यांच्या इतर फायद्यांसह हृदयाच्या आरोग्यासाठी योगदान ठरते आणि शरीराला कर्करोगापासून वाचवू शकतात. त्यातील पोषक घटक मात्र मशरूमच्या प्रकारावर अवलंबून असतात. बहुतेक सर्व खाद्य मशरूममध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट (सेलेनियम, जीवनसत्त्व क व कोलीन) विपुल प्रमाणात असतात. सुमारे 70 ग्रॅम वजनाच्या एक कप कापलेल्या कच्या मशरूममध्ये जवळजवळ 1 ग्रॅम खाद्य तंतू (फायबर) असते. आहारातील फायबर "प्रकार-2-मधुमेह" व बद्धकोष्ठतेसह अनेक आरोग्य स्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. मशरूममधील खाद्य तंतू, पोटॅशियम आणि जीवनसत्त्व 'क' हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी योगदान ठरते.

पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते आणि यामुळे उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्या-संबंधी रोगाचा धोका कमी होऊ शकतो. मशरूममध्ये 'ब' जीवनसत्त्वे भरपूर असतात, उदा. रायबोफ्लेविन, ब -2; फोलेट, ब-9; थायमिन, ब -1; पँटोथिनिक आम्ल, ब-5; नियासिन, ब-3. प्रागैतिहासिक काळापासूनच मानवाकडून मशरूमचा आहारासाठी वापर सुरू असावा असे दिसून येते. 4600 वर्षांपूर्वी, इजिप्शियन लोक मशरूमला अमरत्वाची वनस्पती मानत होते. रोमन लोकांना मशरूम हे देवतांचे अन्न वाटत होते.

चिनी आणि जपानी लोकांनी हजारो वर्षांपासून औषधी उद्देशाने मशरूमचा वापर केला आहे. ऑरीक्युलॅरिया पॉलिट्रीका "इअर फंगस" या मशरूमची, सर्वप्रथम इसवी सनपूर्व 300 ते 200 वर्षी चीनमध्ये लागवड करण्यात आली. फ्रान्समधील पॅरिस येथे 1650 साली मशरूमच्या लागवडीची नोंद आहे. 1865 साली अमेरिकेत यांची लागवड सुरू झाली. भारतात मशरूमची प्रथम लागवड 1940 मध्ये करण्यात आली होती. तथापि, त्याची तांत्रिकरीत्या पद्धतशीर लागवड करण्याचा प्रयत्न 1943 मध्ये प्रथम करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT