आकाशगंगेत मध्यम आकाराची अनेक कृष्णविवरे Pudhari File Photo
विश्वसंचार

आकाशगंगेत मध्यम आकाराची अनेक कृष्णविवरे

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : आपल्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेत लाखो लघु कृष्णविवरे आणि मध्यभागी असलेले एक महाकाय ‘सॅजिटेरियस ए’ नावाचे कृष्णविवर आहे हे आपल्याला माहीत आहे, पण यामधील एक महत्त्वाचा प्रश्न आजवर अनुत्तरित होता. आपल्या आकाशगंगेत मध्यम आकाराची कृष्णविवरे आहेत का? नवीन संशोधन सांगतं, होय, अशी सुमारे डझनभर कृष्णविवरे आकाशगंगेतील मोकळ्या अवकाशात भटकंती करत असावीत!

लघु कृष्णविवरांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. जवळपास प्रत्येक शतकात काही कृष्णविवरे निर्माण होतात आणि यांचे वजन बहुतेक वेळा आपल्या सूर्याच्या 100 पटपर्यंत असतं. दुसरीकडे, आपल्या ‘सॅजिटेरियस ए’ सारख्या महाकाय कृष्णविवरांचे वजन लाखो सूर्याच्या समतुल्य आहे, पण मध्यम आकाराची कृष्णविवरे, ज्यांचे वजन 10,000 ते 1,00,000 सूर्याइतके असते, ही विज्ञानातील एक अनाकलनीय कोडी ठरली आहेत. झ्युरिच विद्यापीठातील वैज्ञानिकांनी याबाबत मोठे पाऊल उचलले. त्यांनी ब्रह्मांडाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या संगणकीय सिम्युलेशन्सचा अभ्यास करून हे ठरवण्याचा प्रयत्न केला की, मिल्की वेमध्ये खरंच मध्यम आकाराची कृष्णविवरे अस्तित्वात असू शकतात का.

त्यांचे संशोधन ‘मंथली नोटिसेस ऑफ द रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशनासाठी स्वीकारण्यात आले आहे. आकाशगंगा म्हणजे एकट्याने वाढणारी रचना नाही. ती अनेक लहान लहान बटू आकाशगंगा गिळून आपले साम—ाज्य वाढवत गेली आहे. संशोधकांनी दाखवून दिले की, अशा बटू आकाशगंगा अनेकदा स्वतःसोबत मध्यम आकाराची कृष्णविवरे घेऊन येतात. आजपर्यंत आकाशगंगेने किमान डझनभर बटू आकाशगंगा गिळल्या आहेत आणि कदाचित त्याहीपेक्षा अधिक! आतापर्यंत असे मानले जात होते की, अशी कृष्णविवरे हळूहळू त्यांच्या यजमान आकाशगंगेच्या मध्यभागी जाऊन तिथल्या महाकाय कृष्णविवराशी विलीन होतात, पण नवीन सिम्युलेशन्स सांगतात की, त्यातील काही कृष्णविवरे आजही स्वतंत्रपणे आकाशगंगेच्या कोपर्‍यांत भटकत असावीत आणि त्यांचे शोधणे अत्यंत कठीण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT