Dr. Annette Wagner | कोमातून बाहेर येताच आईचा मेसेज, तुम्ही आताच शस्त्रक्रिया करून घ्या! 
विश्वसंचार

Dr. Annette Wagner | कोमातून बाहेर येताच आईचा मेसेज, तुम्ही आताच शस्त्रक्रिया करून घ्या!

पुढारी वृत्तसेवा

शिकागो; वृत्तसंस्था : मृत्यूच्या दारातून परतल्यानंतर कोणतीही व्यक्ती आधी स्वतःच्या वेदनांचा आणि प्रकृतीचा विचार करेल; पण शिकागो येथील ६४ वर्षीय बालत्वचारोगतज्ज्ञ डॉ. ॲनेट वॅग्नर याला अपवाद ठरल्या. दोन आठवडे कोमात आणि जीवरक्षक प्रणालीवर (लाइफ सपोर्ट) राहिल्यानंतर डोळे उघडताच, या मातेला स्वतःपेक्षा आपल्या तिन्ही मुलांच्या भविष्याची चिंता सतावत होती. कोमातून बाहेर येताच अवघ्या दोन दिवसांत त्यांनी आपल्या मुलांना एक तातडीचा आणि ठाम संदेश दिला "तुम्हाला आताच शस्त्रक्रिया करून घ्यावी लागेल!"

डॉ. वॅग्नर यांना 'लोयस-डायट्झ सिंड्रोम' हा अत्यंत दुर्मीळ अनुवंशिक आजार आहे. या आजारात शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी (महाधमनी) कमकुवत होऊन ती फाटण्याचा जीवघेणा धोका असतो. वडील, आजोबा आणि भावाचा याच आजाराने मृत्यू झाल्याने वॅग्नर यांनी दशकांपूर्वी कुटुंबाची जनुकीय तपासणी केली होती. त्यातून त्यांना आणि त्यांच्या सहापैकी तीन मुलांना गॅव्हिन (२८), किर्स्टन (३७) आणि चार्ली (३३) हाच 'एसएमएडी३' जनुकीय दोष असल्याचे स्पष्ट झाले होते.

गेल्या वर्षी रुग्णालयात एका रुग्णाची तपासणी करत असताना डॉ. वॅग्नर यांच्या छातीत असह्य वेदना सुरू झाल्या आणि त्यांची महाधमनी फाटली. या संकटकाळात त्यांचे हृदयही बंद पडले होते. दोन आठवडे त्या कोमात होत्या आणि गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

अखेर मृत्यूशी दिलेली झुंज त्या जिंकल्या. कोमातून बाहेर येताच अवघ्या दोन दिवसांत त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना खाटेजवळ बोलावून हा संदेश दिला. त्या म्हणाल्या, "मी या संकटातून वाचले यामागे एक मोठे कारण आहे. जर मी नसते, तर वयाची पंचेचाळीशी ओलांडेपर्यंत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली नसती. पण आपल्या कुटुंबाचा इतिहास पाहता ते खूप उशिराचे ठरले असते. त्यामुळे आता विलंब न करता तुम्हाला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागेल." आईच्या या संदेशाने पुढच्या अवघ्या सहा महिन्यांत गॅव्हिन, किर्स्टन आणि चार्ली या तिन्ही भावंडांनी एकापाठोपाठ एक प्रतिबंधात्मक हृदय शस्त्रक्रिया करून घेतल्या आणि संभाव्य मृत्यूचे सावट कायमचे दूर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT