Mother Disguised as Man | लेकीच्या रक्षणासाठी आईने 37 वर्षे ‘पुरुष’ बनून काढली! Pudhari File Photo
विश्वसंचार

Mother Disguised as Man | लेकीच्या रक्षणासाठी आईने 37 वर्षे ‘पुरुष’ बनून काढली!

पुढारी वृत्तसेवा

तूतीकोरीन (तामिळनाडू) : महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी आपण अनेकदा मोठ्या मंचांवर ऐकतो. पण तामिळनाडूच्या एका छोट्या गावातून समोर आलेली पेच्चियम्मल यांची कहाणी समाजातील कटू वास्तव मांडणारी आहे. आपल्या मुलीचा सुरक्षित सांभाळ करण्यासाठी एका मातेने तब्बल 37 वर्षे पुरुष बनून आयुष्य व्यतीत केले.

तामिळनाडूतील तूतीकोरीनजवळील एका गावात राहणार्‍या पेच्चियम्मल यांचे लग्न झाले, पण लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यावेळी त्या गर्भवती होत्या. एकाकी, विधवा आणि गर्भवती महिला म्हणून समाजात वावरणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. उदरनिर्वाहासाठी बाहेर पडल्यावर त्यांना रोज छेडछाड, अपमान आणि भीतीचा सामना करावा लागत होता. एका अशाच भीषण प्रसंगानंतर त्यांनी ठरवले की, जर स्वतःला आणि मुलीला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपली ओळख बदलावी लागेल.

पेच्चियम्मल यांनी त्यांचे लांब केस कापले. साडी सोडून शर्ट आणि धोती परिधान केली आणि स्वतःचे नाव ठेवले ‘मुथु’. थोड्याच दिवसांत गाव त्यांना ‘मुथु मास्टर’ म्हणून ओळखू लागले. हा बदल त्यांच्यासाठी कोणताही छंद नव्हता, तर जगण्याचा एकमेव मार्ग होता. पुरुष बनताच परिस्थिती बदलली. रस्त्यावरील भीती संपली, लोक सन्मानाने बोलू लागले आणि त्यांना कामही सहज मिळू लागले. मुथु मास्टर म्हणून त्यांनी शेतात मजुरी केली, हॉटेलमध्ये काम केले आणि प्रसंगी मिळेल ते छोटे-मोठे काम करून आपली गुजराण केली. त्यांनी आपल्या मुलीला एकट्याने वाढवले, शिकवले आणि तिचे लग्नही लावून दिले.

विशेष म्हणजे मुलीच्या लग्नानंतरही त्यांनी पुन्हा महिला होण्याचा विचार केला नाही. आज 60 वर्षांच्या असलेल्या पेच्चियम्मल ऊर्फ मुथु मास्टर स्पष्टपणे सांगतात, पुरुष बनून मला जो सन्मान आणि सुरक्षा मिळाली, ती एक महिला म्हणून कधीच मिळाली नव्हती. पेच्चियम्मल यांनी कोणताही इतिहास घडवण्यासाठी हे पाऊल उचलले नव्हते. त्या केवळ एक माता होत्या, ज्यांना आपल्या लेकीचे भविष्य सुरक्षित करायचे होते. याच गरजेपोटी त्यांनी केलेले हे बलिदान आज जगासमोर एक असाधारण उदाहरण ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT