वॉशिंग्टन : वेगवेगळ्या आकाशगंगांच्या मध्यभागी तारे व धुळीमध्ये दडलेल्या 400 पेक्षाही अधिक कृष्णविवरांचा छडा लावण्यात आला आहे. (NASA) धुळीच्या जणू काही कोषातच असल्याने ही कृष्णविवरे आजपर्यंत अज्ञात राहिली होती. त्यापैकी बहुतांश कृष्णविवरांचा शोध 'नासा'च्या (NASA) चंद्रा एक्स-रे ऑब्झर्व्हेटरीने लावला आहे.
ब्रह्मांडातील जवळजवळ प्रत्येक आकाशगंगेच्या केंद्रभागी एक 'सुपरमॅसिव्ह' म्हणजेच अतिशय शक्तिशाली असे कृष्णविवर आहेच. अशी कृष्णविवरे सूर्यापेक्षा लाखो पटीने अधिक मोठी व शक्तिशाली असतात. ही कृष्णविवरे वायू, धूळ आणि तारे गिळंकृत करीत असल्याने त्यांच्यामधून ऊर्जेची तेजस्वी किरणे निर्माण होत असतात.
त्याला 'अॅक्टिव्ह गॅलेक्टिक न्यूक्लेई' (एजीएन) असे म्हटले जाते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या एक्स-रे भागात हे 'एजीएन' अधिक तेजस्वी दिसत असते, असे हार्वर्ड अँड स्मिथसोनियन सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्सचे खगोलशास्त्रज्ञ डोंग-वू किम यांनी सांगितले. त्यामुळे अशा कृष्णविवरांचा छडा लागू शकतो.