टोकियो ः उन्हाळा सुरू झाला की, बाजारात हापूस, पायरी, केशर अशा आंब्यांची रेलचेल सुरू होते. त्यांचे किलो किंवा डझनाचे दर अनेकवेळा आपल्याला जास्त वाटत असतात; पण तुम्ही कधी अशा आंब्याबद्दल ऐकले आहे का, ज्याच्या एका किलोच्या किमतीत भारतात एक आलिशान बाईक किंवा सेकंड हँड कार येऊ शकते? आपण जगातील सर्वात महागडा आंबा ‘मियाझाकी’बद्दल बोलत आहोत.
मियाझाकी आंबा प्रामुख्याने जपानमधील मियाझाकी शहरात पिकवला जातो. याला जपानी भाषेत ‘ताईयो-नो-तामागो’ असे म्हणतात, ज्याचा अर्थ होतो ‘सूर्यपुत्र’ किंवा ‘सूर्याचे अंडे.’ गडद लाल आणि जांभळट रंगाचा हा आंबा दिसायला एखाद्या मोठ्या रत्नासारखा वाटतो. या आंब्याच्या प्रत्येक फळाची देखभाल एखाद्या लहान बाळाप्रमाणे केली जाते. झाडावर असताना प्रत्येक आंब्याला एका जाळीत बांधले जाते. जेणेकरून तो जमिनीवर पडून खराब होऊ नये. या आंब्याला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळेल अशी व्यवस्था केली जाते. सूर्याच्या उष्णतेमुळेच त्याला तो गडद लाल रंग प्राप्त होतो. केवळ 350 ग्रॅमपेक्षा जास्त वजन असलेल्या आणि ज्यामध्ये साखरेचे प्रमाण 15 टक्क्यांहून अधिक आहे, अशाच आंब्यांना ‘मियाझाकी’ ब—ँडखाली विकले जाते. मियाझाकी आंब्याची चोरी होण्याचा धोका खूप जास्त असतो. ऐकून आश्चर्य वाटेल; पण मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका शेतकर्याने जेव्हा ही झाडे लावली, तेव्हा त्याने त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा रक्षक आणि शिकारी कुत्रे तैनात केले होते.