वॉशिंग्टन : ‘द गार्डियन’च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या कोलोराडो राज्याच्या रॉकी पर्वतांमध्ये लपलेला ‘एडीएक्स फ्लोरेन्स’ जो जगातील सर्वात धोकादायक तुरुंग मानला जातो. हा जगातील सर्वात हाय सिक्युरिटी सुपरमॅक्स तुरुंग आहे. हा तुरुंग 1994 मध्ये बनला असून, इथे फक्त अशा लोकांना पाठवलं जात ज्यांना सरकार घाबरतं. मग ते दहशतवादी असो, सीरियल किलर असो किंवा गँग लीडर असो. या तुरुंगाचे नाव ऐकूनच केवळ गुन्हेगारी जगातच नाही तर सुरक्षा यंत्रणांमध्येही थरकाप उडतो.
‘एडीएक्स फ्लोरेन्स’ तुरुंगाचं डिझाईन असं करण्यात आलंय की याला ‘एस्केप-प्रूफ’ म्हणजे जिथून सुटण्याची शक्यता 0 टक्के आहे. या तुरुंगाचा संपूर्ण परिसर काँक्रीटच्या मोठ्या ब्लॉक्स सारखा आहे. या तुरुंगाच्या भिंती एवढ्या मोठ्या आहेत की ज्यातून आवाज सुद्धा पलीकडे जाऊ शकत नाही. ‘एडीएक्स फ्लोरेन्स’ तुरुंगाच्या खिडक्या फक्त 4 इंच रुंद आहेत आणि त्यांचं डिझाईन असं आहे की, कैद्यांना बाहेरील द़ृश्य पाहता येत नाही. तुरुंगात कॅमेरे आणि सेन्सर्स आहेत. एकंदरीत व्यवस्था अशी आहे की, केवळ मानवच नाही तर हवा देखील परवानगीशिवाय बाहेर पडू शकत नाही. या तुरुंगात कैद्यांना दिवसाचे 23 तास एकट्याने सेलमध्ये राहावं लागतं. कैद्यांचे सेल हे अतिशय छोट्या आकाराचे असतात. ज्यात फक्त एक बेड, एक टॉयलेट आणि भिंतींवर लावलेले काही कंट्रोल सिस्टम असतात.
इथे कोणाला कोणाशी भेटायला दिलं जात नाही. एका अर्थाने कैद्यांना त्यांच्या स्वतःच्या सावलीपासूनही वंचित ठेवले जाते. तासन्तास शांतता, दगडांची थंडी आणि एकटेपणा हीच खरी कैद्यांसाठीची शिक्षा असते. या तुरुंगातील प्रत्येक कपर्यांमध्ये हायटेक कॅमेरे आणि स्टीलचे अनेक लेयर्स असलेले दरवाजे फिट केले आहेत. कैद्यांच्या कक्षात प्रवेश करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक लॉकिंग सिस्टम बसवण्यात आली आहे आणि सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक चोवीस तास तैनात असतात. अभेद्य सुरक्षा व्यवस्था असून सुद्धा तुरुंगातील प्रत्येक हालचालींची दोनदा तपासणी केली जाते. अन्न पुरवणे असो, औषधोपचार असो किंवा कैद्याला दुसर्या ब्लॉकमध्ये हलवणे असो, येथे सर्वकाही नियोजन आणि देखरेखीसह केले जाते. कैद्यांना दिवसातून फक्त एक तासाचा एअर टाईम दिला जातो. या काळात ते एका लहान, काँक्रीटने बंदिस्त अंगणात मुक्तपणे फिरू शकतात. या तुरुंगातून एकही कैदी पळून गेलेला नाही.