नवी दिल्ली : डास फक्त माणसांनाच चावतात आणि आजार पसरवतात, असा आपला समज असतो; पण निसर्गाच्या कुशीत काही अशा गोष्टी घडतात, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. एका वाईल्डलाईफ फोटोग्राफरने नुकताच एक असा दुर्मीळ क्षण टिपला आहे, ज्यामध्ये एक छोटासा डास चक्क एका विषारी सापाचे रक्त पिताना दिसत आहे.
जगातील सर्वात घातक सापावर डासाचा हल्ला
कोस्टा रिकाच्या जंगलात एका फोटोग्राफरने फेर-डी-लान्स या अत्यंत विषारी सापाच्या डोक्यावर बसून रक्त पिणाऱ्या डासाचे छायाचित्र टिपले आहे. मध्य अमेरिकेतील हा सर्वात घातक साप मानला जातो, तरीही एका इवल्याशा डासाने बेफिकीरपणे त्याचे रक्त पिऊन आपली भूक भागवली. भारतातही वाईन स्नेकवर डास बसल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
साप डासाला मारत का नाही?
हे छायाचित्र पाहिल्यावर अनेकांना प्रश्न पडला की, इतका खतरनाक साप डासाला मारत का नाही? वैज्ञानिकांनी याची काही रंजक कारणे सांगितली आहेत. साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे. तो विनाकारण आपली ऊर्जा खर्च करत नाही. डासाचा डंख इतका सौम्य असतो की, अनेकदा सापाला तो जाणवतही नाही. साप विश्रांती घेत असताना किंवा झोपेत असताना अशा छोट्या त्रासांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. सापाच्या शरीरावरील खवल्यांमध्ये काही अतिशय सूक्ष्म छिद्रे असतात, जिथे डास आपली सोंड सहज खुपसून रक्त पिऊ शकतो.
अनेकांना वाटते की, विषारी सापाचे रक्त पिल्यावर डास मरत असेल; पण तसे होत नाही. सापाचे विष त्याच्या ग्रंथींमध्ये असते, रक्तामध्ये नाही. त्यामुळे सापाचे रक्त डासासाठी पोषक घटकांनी भरलेले असते आणि त्याला त्यापासून कोणतीही इजा होत नाही. हे फोटो केवळ मनोरंजनासाठी नसून, विज्ञानाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत. फ्लोरिडासारख्या ठिकाणी वैज्ञानिक चक्क डासांच्या मदतीने बर्मीज पायथनसारख्या आक्रमक सापांचा मागोवा घेतात. डास हे वेस्ट नाईल व्हायरससारख्या आजारांचे वाहक सापांपर्यंत पोहोचवू शकतात का, याचाही अभ्यास आता केला जात आहे.