वॉशिंग्टन : कोणत्याही जटिल रासायनिक प्रक्रियेशिवाय किंवा मोठ्या औद्योगिक यंत्रणेविना साध्या नैसर्गिक पदार्थाने पाणी शुद्ध करणे आता शक्य होणार आहे. शेवग्याच्या बिया पाण्यातील घातक ‘मायक्रोप्लास्टिक’ ओढून काढण्यासाठी रासायनिक प्रक्रियेपेक्षाही प्रभावी ठरू शकतात, असा दावा शास्त्रज्ञांनी एका नवीन संशोधनात केला आहे.
अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी आणि ब्राझीलमधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ साओ पाऊलो स्टेट युनिव्हर्सिटी’ (ICT - UNESP) येथील संशोधकांनी हा शोध लावला आहे. शेवग्याच्या बियांचा अर्क पाण्यातील प्लास्टिकचे सूक्ष्म कण एकमेकांना चिकटवून त्यांचे पुंजके तयार करतो, ज्यामुळे हे कण गाळून काढणे सोपे होते. हे संशोधन ‘एसीएस ओमेगा’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. पाणी शुद्धीकरण केंद्रांमध्ये सहसा ‘अल्युमिनियम सल्फेट’ या रसायनाचा वापर केला जातो. मात्र, संशोधक गॅब्रिएल बॅतिस्टा यांच्या मते, शेवग्याच्या बियांच्या अर्काची कामगिरी या रसायनासारखीच असून, अल्कधर्मी पाण्यात तर हा नैसर्गिक अर्क रसायनापेक्षाही उत्तम काम करतो.
हा उपाय अत्यंत स्वस्त असून, ग्रामीण भाग आणि लहान समुदायांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शेवगा मूळचा भारतीय असून, तो उष्णकटिबंधीय प्रदेशात सहज आढळतो. बियांचा हा अर्क घरीदेखील तयार करता येऊ शकतो. मायक्रोप्लास्टिक आणि इतर प्रदूषकांवर ऋण प्रभार असतो, ज्यामुळे ते एकमेकांपासून दूर ढकलले जातात आणि गाळणे कठीण होते. शेवग्याच्या बियांचा अर्क हा प्रभार नष्ट करतो. यामुळे प्लास्टिकचे सूक्ष्म कण एकत्र येतात आणि त्यांचे मोठे पुंजके तयार होतात, जे वाळूच्या फिल्टरमधून सहज वेगळे करता येतात. या संशोधनाचे नेतृत्व करणारे प्राध्यापक एड्रियानो गोन्काल्विस डॉस रेस यांच्या मते, मोठ्या प्रमाणावर वापर करताना काही तांत्रिक मर्यादा असल्या, तरी शेतवस्त्या, ग्रामीण भाग आणि लहान वस्त्यांमध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी ही पद्धत अत्यंत कार्यक्षम आणि किफायतशीर ठरेल.