Earth atmosphere | पृथ्वीचे वातावरण गुपचूप खातोय चंद्र! Pudhari File Photo
विश्वसंचार

Earth atmosphere | पृथ्वीचे वातावरण गुपचूप खातोय चंद्र!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन: आपल्या पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र, गेल्या कित्येक अब्ज वर्षांपासून गुपचूप पृथ्वीच्या वातावरणातील सूक्ष्म अंशांचे भक्षण करत आहे. लाईव्ह सायन्स या प्रसिद्ध विज्ञान मासिकाने प्रसिद्ध केलेल्या एका नवीन संशोधनातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शोधामुळे नासाच्या अपोलो मोहिमेतील चंद्राच्या मातीच्या नमुन्यांवर आधारित असलेला 20 वर्षांपूर्वीचा जुना सिद्धांत आता पूर्णपणे बदलला आहे.

नेमका शोध काय आहे?

युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टरच्या संशोधकांनी केलेल्या या अभ्यासानुसार, पृथ्वीच्या वातावरणातील आयन्स सौर वार्‍यांच्या प्रवाहामुळे आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे थेट चंद्रापर्यंत पोहोचतात आणि तिथे शोषले जातात.

ही प्रक्रिया कशी घडते? या विषयी संशोधकांनी सांगितले की, पृथ्वीभोवती एक अद़ृश्य चुंबकीय कवच असते. जेव्हा सूर्याकडून येणारे सौर वारे पृथ्वीला धडकतात, तेव्हा पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला एका लांब शेपटीसारखा चुंबकीय भाग तयार होतो, ज्याला मॅग्नेटोटेल म्हणतात. दर महिन्याला जेव्हा पौर्णिमा असते, तेव्हा चंद्र नेमका पृथ्वीच्या या चुंबकीय शेपटीतून प्रवास करतो. या काळात पृथ्वीच्या वरच्या वातावरणातील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे सूक्ष्म कण या चुंबकीय लहरींच्या सहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागावर फेकले जातात. चंद्राची माती हे कण स्वतःमध्ये शोषून घेते.

या शोधाचे महत्त्व

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हे संशोधन हा केवळ खगोलीय चमत्कार नसून मानवासाठी महत्त्वाचा पुरावा आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर पृथ्वीच्या प्राचीन वातावरणाचे अंश अब्जावधी वर्षांपासून जतन केलेले आहेत. याचा अर्थ असा की, पृथ्वीवर जेव्हा जीवसृष्टीची सुरुवात झाली, त्या काळातील वातावरणाचे स्वरूप समजून घेण्यासाठी आता चंद्राची माती हा सर्वात मोठा ऐतिहासिक संग्रह ठरणार आहे. भविष्यात जेव्हा मानव चंद्रावर वसाहती स्थापन करेल, तेव्हा तिथे मिळणारे हे घटक श्वासोच्छवासासाठी किंवा इतर प्रक्रियांसाठी उपयुक्त ठरू शकतात का, यावर आता शास्त्रज्ञ अधिक संशोधन करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT