डोळ्यांची काळजी  Pudhari File Photo
विश्वसंचार

Eye Health : पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

ऋतू बदलात डोळ्यांच्या आरोग्याकडे करू नका दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पावसाळा आपल्यासोबत थंडावा आणि दिलासा घेऊन येतो; परंतु हा ऋतू अनेक प्रकारच्या व्हायरस आणि बॅक्टेरियाच्या संसर्गासाठीही अनुकूल मानला जातो. याच काळात डोळे लाल होणे, खाज सुटणे, पाणी येणे आणि ‘कंजंक्टिव्हायटिस’ (डोळे येणे) यांसारख्या समस्यांचे प्रमाण वाढते. अशा वेळी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, असा प्रश्न अनेक जणांच्या मनात उपस्थित होतो.

तज्ज्ञांच्या मते, केवळ आकाशातून पडणारे पावसाचे शुद्ध पाणी नेहमीच संसर्गाचे कारण ठरत नाही. मात्र, वातावरणातील प्रदूषण, धूळ, बॅक्टेरिया, व्हायरस आणि इतर सूक्ष्मजीवांच्या संपर्कात आल्यानंतर हेच पाणी डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. म्हणूनच मान्सूनमध्ये डोळ्यांची स्वच्छता आणि काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सामान्य परिस्थितीत पावसाचे पाणी स्वतः संसर्ग निर्माण करत नाही. 'NCBI' च्या अभ्यासानुसार, पावसाचे पाणी जेव्हा दूषित वातावरण, धूळ, वाहनांचा धूर, साचलेले गलिच्छ पाणी किंवा संसर्गजन्य पृष्ठभागाच्या संपर्कात येते, तेव्हा त्यातील सूक्ष्मजीव डोळ्यांपर्यंत पोहोचू शकतात. जर एखाद्या व्यक्तीला आधीपासूनच डोळ्यांची ॲलर्जी, ड्राय आय, कॉर्नियाची दुखापत असेल किंवा ती व्यक्ती कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असेल, तर संसर्गाचा धोका अधिक वाढतो. म्हणूनच पावसाळ्यात भिजल्यानंतर डोळ्यांत जळजळ किंवा लालसरपणा जाणवल्यास दुर्लक्ष करू नये. मान्सूनमध्ये होणारे डोळ्यांचे प्रमुख संसर्गः व्हायरल कंजंक्टिव्हायटिस (Pink Eye): ‘सायन्स डायरेक्ट'नुसार, मान्सूनमध्ये सर्वाधिक आढळणारा संसर्ग म्हणजे ‘व्हायरल कंजंक्टिव्हायटिस'. यामध्ये डोळे लाल होतात, सतत पाणी येते, जळजळ आणि खाज सुटते. हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज पसरू शकतो. बॅक्टेरियल कंजंक्टिव्हायटिस : 'NCBI'नुसार, या संसर्गामध्ये डोळ्यांतून पिवळा किंवा हिरवट चिकट द्रव निघू लागतो. सकाळी उठल्यावर पापण्या चिकटणे हे याचे सामान्य लक्षण आहे. वेळेवर उपचार न केल्यास संसर्ग वाढू शकतो. रांजणवाडी (Stye) : पावसाळ्यात पापण्यांमधील तेल ग्रंथींमध्ये बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे रांजणवाडी होऊ शकते. यामध्ये पापणीवर वेदनादायी लहान गाठ तयार होते. कॉर्नियल इन्फेक्शन (Keratitis): ‘सायन्स डायरेक्ट'नुसार, पावसाचे गलिच्छ पाणी डोळ्यात गेल्यास किंवा कॉन्टॅक्ट लेन्सची स्वच्छता व्यवस्थित न ठेवल्यास कॉर्नियामध्ये (डोळ्याच्या बाहुलीवर) संसर्ग होण्याचा धोका वाढतो. ही स्थिती गंभीर असू शकते आणि दृष्टीवरही परिणाम करू शकते. पावसाचे पाणी डोळ्यात गेल्यास त्वरित काय करावे? डोळे अजिबात चोळू नका. स्वच्छ पाणी किंवा स्टेराईल सलाईनने डोळे स्वच्छ धुवा. तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल, तर पावसाचे पाणी लागल्यानंतर त्या त्वरित काढून टाका. डोळा पूर्णपणे सामान्य झाल्यावरच त्या पुन्हा वापरा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यात कोणतेही ड्रॉप्स टाकू नका. २४ तासांपेक्षा जास्त वेळ डोळे लाल राहिल्यास, वेदना झाल्यास, अंधूक दिसू लागल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या.

SCROLL FOR NEXT