रांची : माकडं कधी कोणता उपद्व्याप करतील हे काही सांगता येत नाही. अनेक ठिकाणी माकडं हातातील वस्तू खेचतात; पण सध्या एका माकडाचा ‘हटके’ व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की एक माकड वाईन शॉपमध्ये घुसले. त्यानंतर जे काही झालं ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं?
ही घटना झारखंडची राजधानी रांची येथील आहे. शुक्रवारी ओरमांजीच्या ब्लॉक चौक येथील एका वाईन शॉपमध्ये अचानक एक माकड घुसले. दुकानात पोहोचल्यानंतर त्याने असे काही केले की तिथे उपस्थित लोकही पाहत राहिले. माकडाने दुकानात ठेवलेल्या दारूच्या बाटल्यांपैकी एक बाटली उघडली आणि दारू प्यायला सुरुवात केली. त्यानंतर टल्ली होऊन तिथेच आरामात झोपले! नागरिकांनी सांगितले की, माकड अचानक वाईन शॉपच्या आत पोहोचले होते. सुरुवातीला दुकानात असलेले लोक त्याला पाहून हैराण झाले.
दुकानदाराने त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माकडाने त्याचा चावा घेतला. त्यामुळे दुकानदार बाहेर पळाला. त्यानंतर माकडाने दुकानात ठेवलेल्या दारूच्या एका बाटलीतील दारू प्यायली. दारू प्यायल्यानंतर ते दुकानातच आरामात झोपी गेले. माकडाच्या या अनोख्या ‘कारनाम्या’ची बातमी परिसरात पसरताच ठिकाणी लोकांची गर्दी जमली. माकड जेव्हा दुकानात झोपले तेव्हा याची माहिती रेस्क्यू टीमला देण्यात आली. माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि माकडाला सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. टीमचा प्रयत्न होता की माकडाला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षित ठिकाणी नेण्यात यावे. अखेर या माकडाला पकडून बाहेर काढण्यात आले!