...आणि हेलिकॉप्टरमधून पडला पैशाचा पाऊस! Pudhari File Photo
विश्वसंचार

...आणि हेलिकॉप्टरमधून पडला पैशाचा पाऊस!

आकाशातून पैशांचा पाऊस पडतानाचा व्हिडीओ व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेतील मिशिगन राज्यातील डेट्रॉईड शहरात पैशांचा पाऊस पडला आहे. ही काही परीकथा वगैरे नाही खरोखरच इथे एका ठिकाणी आकाशातून चलनी नोटा पडल्या. शहराच्या ईस्टसाईड भागातील एका कबरीजवळ आकाशातून फुलांच्या पाकळ्या आणि नोटांचा पाऊस पडला. यामागे एक विशेष कारण आहे. हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत असून आकाशातून पैशांचा पाऊस पडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

डेट्रॉईटच्या ईस्टसाईडमध्ये राहणारे डॅरेल थॉमस हे स्थानिकांमध्ये दानशूर व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या मृत्यूनंतरही, त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांनी समाजाप्रती आपण देणं लागतो ही भावना कायम ठेवत आगळ्यावेगळ्या पद्धतीने डॅरेल यांना श्रद्धांजली वाहिली. शुक्रवारी, 27 जून रोजी, थॉमस यांच्या कुटुंबाने त्यांना दफन करण्यात आलेल्या ठिकाणी एका हेलिकॉप्टरमधून गुलाबाच्या पाकळ्या आणि चलनी नोटांचा पाऊस पाडम्याची व्यवस्था केली. ठरलेल्या योजनेनुसार, कॉनर स्ट्रीटजवळील ग्रॅटिओट अव्हेन्यूवर गुलाबाच्या पाकळ्या आणि पैसे हेलिकॉप्टरमधून टाकण्यात आले.

‘डेट्रॉईट फ्री प्रेस’मधील वृत्तानुसार, दुपारी 1 वाजून 27 मिनिटांनी डेट्रॉईटमध्ये थॉमसच्या मालकीच्या कार वॉश शोरूम शाईन एक्स्प्रेसजवळ ही आगळीवेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. 15 जून रोजी वयाच्या 58 व्या वर्षी थॉमस यांचे निधन झाले. त्यांची मुलं, डॅरेल आणि जोन्टे यांनी हेलिकॉप्टरमधून पैसे ड्रॉप करण्याची व्यवस्था केली. या दोघांनी 5 हजार डॉलर्सची कॅश आणि गुलाबाच्या पाकळ्या हेलिकॉप्टरमधून पाडल्या. गुलाबाच्या पाकळ्या आकाशातून सोडल्या जातील याबद्दल स्थानिक पोलिसांना आगाऊ सूचना देण्यात आली होती; मात्र पैसे देखील टाकले जातील याची पोलिसांना काहीच कल्पना नव्हती.

भारतीय चलनानुसार, थॉमसच्या आठवणीत त्याच्या मुलांनी 4 लाख 30 हजार रुपयांची कॅश हेलिकॉप्टरमधून उधळली. या नोटा गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हेलिकॉप्टरमधून पैशांचा वर्षाव होत असल्याचे दिसत आहे. या कृतीसाठी डेट्रॉईटमधील या उद्योजकाच्या कुटुंबीयांचं सोशल मीडियावरून कौतुक केलं जात आहे; मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता हेलिकॉप्टरमधून नोटा फेकल्याप्रकरणी फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन सध्या या घटनेची चौकशी करत आहे. दुसरीकडे डेट्रॉईट पोलिसांनी आपण सदर प्रकरणात कोणाचीही चौकशी करत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT