वॉशिंग्टन : सौरमालेत पृथ्वीबाहेर जीवसृष्टी शोधणार्या शास्त्रज्ञांना आता एक मोठे यश मिळाले आहे. गुरू ग्रहाचा बर्फाच्छादित चंद्र असलेल्या ‘युरोपा’च्या पृष्ठभागावर जीवसृष्टीसाठी पोषक ठरू शकतील असे अमोनियाचे रेणू सापडले आहेत. नासाच्या ‘जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी’चे संशोधक अल इम्रान यांनी 25 वर्षांपूर्वीच्या जुन्या माहितीचे विश्लेषण करताना हा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे.
हे संशोधन ‘द प्लॅनेटरी सायन्स जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. ‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञ अल इम्रान यांनी 1995 ते 2003 दरम्यान गुरूचा अभ्यास करणार्या ‘गॅलिलिओ’ या मोहिमेतील जुन्या माहितीची पुन्हा तपासणी केली. 1997 मध्ये गॅलिलिओच्या ‘निअर-इन्फ्रारेड मॅपिंग स्पेक्ट्रोमीटर’ने गोळा केलेल्या डेटामध्ये युरोपाच्या बर्फाळ पृष्ठभागावरील भेगांजवळ अमोनियाचे पुसट संकेत मिळाले आहेत. पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि पाण्यासोबतच नायट्रोजन अत्यंत महत्त्वाचा असतो.
अमोनिया हा नायट्रोजनयुक्त रेणू असल्याने, त्याचा शोध लागणे हे युरोपावर जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेच्या द़ृष्टीने अत्यंत आशादायक मानले जात आहे. शास्त्रज्ञांच्या मते, युरोपाच्या पृष्ठभागावरील भेगांमधून अमोनिया मिश्रित पाणी बाहेर आले असावे. अमोनिया पाण्याला गोठण्यापासून रोखण्याचे काम करतो, ज्यामुळे अतिथंड वातावरणातही पाणी द्रव स्वरूपात राहू शकते. नायट्रोजन हा जीवसृष्टीच्या रासायनिक प्रक्रियेतील मुख्य घटक असल्याने या शोधाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गॅलिलिओ अंतराळयान 2003 मध्ये इंधन संपल्यामुळे नष्ट करण्यात आले होते.
युरोपा किंवा इतर चंद्रांवर पृथ्वीवरील जीवाणूंचे प्रदूषण होऊ नये, म्हणून हे यान मुद्दाम गुरू ग्रहाच्या वातावरणात पाडून नष्ट करण्यात आले होते. ही मोहीम 20 वर्षांपूर्वी संपली असली, तरी नवीन तंत्रज्ञान आणि सखोल अभ्यासाच्या जोरावर शास्त्रज्ञ आजही त्या जुन्या माहितीमधून नवीन शोध लावत आहेत. ‘युरोपावर पहिल्यांदाच अशा प्रकारे अमोनियाचा शोध लागला आहे. सौरमालेत परग्रहावरील जीवसृष्टी शोधण्यासाठी युरोपा हे सर्वात योग्य ठिकाण असल्याचे यातून पुन्हा सिद्ध होत आहे,’ असे ‘नासा’च्या निवेदनात म्हटले आहे.