लंडन : रिलेशनशिपमध्ये वारंवार मिळणारा धोका आणि पुरुषांच्या वर्तनाला कंटाळून स्वतःशीच लग्नगाठ (सोलोगॅमी) बांधणारी ३६ वर्षीय ब्राझिलियन मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर सुलेन कॅरी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेत आली आहे. स्वतःवर जीवापाड प्रेम करण्यासाठी गेल्या वर्षी धूमधडाक्यात लग्न करणाऱ्या सुलेनने अवघ्या एका वर्षात स्वतःलाच कंटाळून चक्क ‘स्वतःपासूनच घटस्फोट’ घेतला आहे.
लंडनमध्ये राहणाऱ्या सुलेन कॅरीचे पुरुषांसोबतचे अनुभव अतिशय वाईट होते. त्यामुळे तिने कोणत्याही पुरुषावर अवलंबून न राहता स्वतःलाच आपला ‘सोलमेट’ बनवण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी तिने पांढरा शुभ्र गाऊन परिधान करून, केक कापून आणि स्वतःशीच एकनिष्ठ राहण्याच्या आणाभाका घेत लग्न केले होते. तिच्या या ‘सोलोगॅमी’ लग्नाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती.
घटस्फोट घेण्याचे कारण काय?
लग्नानंतर सुलेन स्वतःसोबतच डेटवर जाऊ लागली, स्वतःलाच गिफ्ट देऊ लागली. परंतु, वर्षभरातच तिचे हे मत बदलले. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या घटस्फोटाची घोषणा केली. सुलेनने सांगितले की, "स्वतःसोबत राहताना मला प्रचंड एकटेपणा जाणवू लागला. स्वतःच्याच नात्यात राहून मी स्वतःवर इतका मानसिक दबाव आणत होते की, मी आता स्वतःलाच सहन करू शकत नाहीये. मी पूर्णपणे थकावून टाकले आहे, त्यामुळे मी स्वतःपासून ब्रेकअप करत आहे.’’
पब्लिसिटी स्टंट की मानसिक कोंडी?
सुलेनच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर नेटिझन्सनी तिला प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही युजर्सनी, "जर तू स्वतःलाच सहन करू शकत नाहीस, तर तुला दुसरा कोण सहन करणार?" असा सवाल केला आहे, तर काहींनी हा निव्वळ 'पब्लिसिटी स्टंट' असल्याचा दावा केला आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते, स्वतःशी लग्न करणे ही स्वतःला प्राधान्य देण्याची एक चांगली संकल्पना वाटू शकते; परंतु मानव हा सामाजिक प्राणी आहे. प्रदीर्घ काळासाठी एकटे राहणे प्रत्येकालाच जमेल असे नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून मिळणारा भावनिक आणि मानसिक पाठिंबा स्वतःशी लग्न केल्याने मिळू शकत नाही, सुलेनची घटना हेच दर्शवते.