केंब्रिज : केवळ कठोर परिश्रम तुम्हाला यशस्वी बनवू शकत नाहीत, तर तुमचे कष्ट योग्य दिशेला असणे अधिक महत्त्वाचे आहे, असे मत डेल्व्ह या स्टार्टअपची सह-संस्थापक सेलिन कोकालर हिने व्यक्त केले आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून शिक्षण सोडणार्या सेलिनने तिच्या व्यवसायाचे मूल्य आज 300 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2500 कोटी रुपये) वर नेऊन ठेवले आहे.
2021 मध्ये प्रथम वर्षाला असताना सेलिनची भेट तरुण कौशिकशी झाली. एआय आणि हेल्थ टेक क्षेत्रातील समान आवडीमुळे दोघांनी एकत्र येत डेल्व्हची पायाभरणी केली. ही कंपनी एआय एजंटस्च्या मदतीने रेग्युलेटरी कॉम्प्लायन्सचे काम स्वयंचलित करते, ज्यामुळे मानवी श्रमाची मोठी बचत होते. विशेष म्हणजे, एका हॉस्टेलच्या खोलीतून सुरू झालेल्या या स्टार्टअपला जानेवारीत 3 दशलक्ष डॉलर्सचे सीड फंडिंग मिळाले होते.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सेलिनने तरुण उद्योजकांना मोलाचा सल्ला दिला. ती म्हणाली, “केवळ जिद्द आणि कष्ट तुम्हाला यशस्वी करतात, हा आजवर मला मिळालेला सर्वात वाईट सल्ला आहे. आयुष्य हे झाडावर चढण्यासारखे आहे. जर तुम्ही तुमची शिडी चुकीच्या झाडाला लावली, तर कितीही कष्ट करून तुम्ही शिखरावर पोहोचलात तरी तुम्हाला अपेक्षित फळ मिळणार नाही.“कष्टांपेक्षा तुमचा अप्रोच (द़ृष्टिकोन) योग्य असणे महत्त्वाचे असल्याचे तिने नमूद केले.
टाईम ट्रॅव्हलरसारखा विचार यशस्वी होण्यासाठी सेलिनने जनरेशनल थिंकिंगचा मंत्र दिला. ती म्हणते, “स्वतःला भविष्यातील 50 वर्षे पुढे असलेला यशस्वी व्यक्ती समजा आणि तिथून मागे वळून पाहा की, आज तुम्ही काय करणे अपेक्षित आहे. स्टीव्ह जॉब्ससारखे बनायचे असेल, तर तुमचा आजचा दिवस तसाच असायला हवा. तसेच, जगाच्या विरुद्ध दिशेला जाण्याचे धाडस दाखवा, असा सल्लाही तिने दिला. हायस्कूलमध्ये असताना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रयोग करणार्या आणि 20 वर्षांची होईपर्यंत 8 शोधनिबंध प्रकाशित करणार्या सेलिनचा हा प्रवास आजच्या तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.