सिडनी : रुग्णाला भविष्यात पक्षाघाताचा (स्ट्रोक) किती धोका आहे, याचे अचूक भाकीत करण्यासाठी आणि त्यानुसार उपचार करण्यासाठी संशोधकांनी मानवी रक्तवाहिन्यांचे सूक्ष्म मॉडेल, म्हणजेच ‘आर्टरीज-ऑन-अ-चिप’ तयार केले आहे. यामुळे प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार वैयक्तिक उपचार पद्धती आखणे शक्य होणार असल्याचे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे.
‘सेल बायोमटेरियल्स’ या नियतकालिकात जुलैमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात, वैज्ञानिकांनी कॅरोटिड धमनीची (Carotid Artery) ही सूक्ष्म प्रतिकृती तयार केली. ही रक्तवाहिनी मेंदू, चेहरा आणि मान या भागांना रक्ताचा पुरवठा करते. या तंत्रज्ञानामुळे रुग्णाच्या शरीरातील रक्तप्रवाह कसा होतो, त्याच्या रक्तवाहिनीमध्ये कोणत्या प्रकारची आणि कशी रक्ताची गाठ तयार होते, तसेच ही अडथळ्याची समस्या दूर करण्यासाठी कोणते औषध सर्वाधिक प्रभावी ठरेल, हे डॉक्टरांना आधीच ओळखता येणार आहे.
सध्या ही संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर असली तरी, भविष्यात गुंतागुंतीच्या वैद्यकीय प्रकरणांमध्ये ती अत्यंत उपयुक्त ठरेल. अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि सिडनी विद्यापीठातील संशोधक चार्ल्स झाओ यांनी सांगितले, ‘हे तंत्रज्ञान अशा रुग्णांसाठी सर्वात जास्त फायदेशीर ठरेल ज्यांना औषधोपचार सुरू असतानाही वारंवार स्ट्रोकचा झटका येतो किंवा जिथे डॉक्टरांकडे उपचारांचे अनेक पर्याय उपलब्ध असतात, पण योग्य पर्याय निवडण्यासाठी पुरेशी तांत्रिक माहिती उपलब्ध नसते.’
हृदयविकारानंतर जागतिक स्तरावर ‘इस्केमिक स्ट्रोक’ हे मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीमध्ये रक्ताची गाठ अडकल्यामुळे मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन मिळत नाही आणि स्ट्रोकचा झटका येतो. लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल ही स्ट्रोकची मुख्य कारणे आहेत. सुमारे ५ पैकी १ स्ट्रोकची केस ही ‘अथेरोस्क्लेरोसिस’ (Atherosclerosis) म्हणजेच रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर जमा झाल्यामुळे होते.