वॉशिंग्टन ः जगभरात अनेक लोक मत्स्याहार करीत असतात. केवळ त्यासाठीच नव्हे तर अॅक्वॅरियममध्ये सोडण्यासाठीही मासे पकडले जात असतात. माशांच्याही अनेक सुंदर प्रजाती आहेत. असे सुंदर मासे अॅक्वॅरियमची शोभा वाढवत असतात. हॉटेलपासून घरापर्यंत अनेक प्रकारची लहान-मोठी अॅक्वॅरियम पाहायला मिळतात. त्यासाठी जे मासे आणले जातात त्यापैकी सर्वात महागडा मासा म्हणजे एरोवाना. त्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे.
हा मासा दक्षिण अमेरिकेच्या अॅमेझॉनमधील ओयापॉक आणि रुपुनुनी नदीत आढळतो. गयानाच्या गोड्या पाण्यात तसेच दक्षिण आशियामध्येही हा मासा आढळतो. तो पाच फुटांपर्यंतही उडी घेऊ शकतो. प्रामुख्याने गोड्या पाण्यातच राहणार्या या माशाची सहनशीलता खार्या पाण्यात कमी होते. हा मासा घरात ठेवल्याने समृद्धी येते असा एक समज आहे. त्यामुळे आणि अत्यंत सुंदर रंगरूपामुळेही या माशाला मोठी किंमत असते. हा मासा वीस वर्षे जगू शकतो. त्याची वाढ 120 सेंटीमीटरपर्यंत होऊ शकते. वजन सुमारे पाच किलो असते. सामान्य स्थितीत या माशाला एक कोटीच्या आसपास किंमत मिळते. अनेक देशांमध्ये त्याची तस्करी करून तो दोन कोटी रुपयांनाही विकला जातो.