वॉशिंग्टन : आपली आकाशगंगा सुरुवातीपासूनच एवढी अवाढव्य नव्हती, तर तिने इतर लहान दीर्घिका गिळंकृत करून स्वतःचा विस्तार केला आहे, असा दावा एका नवीन संशोधनात करण्यात आला आहे. खगोलशास्त्रज्ञांनी आकाशगंगेच्या मध्यवर्ती भागाजवळ काही अतिशय दुर्मीळ आणि प्राचीन ताऱ्यांचा शोध लावला आहे. हे तारे सुमारे १० अब्ज वर्षांपूर्वी आकाशगंगेने फस्त केलेल्या एका छोट्या दीर्घिकेचे अवशेष असू शकतात, असा अंदाज आहे. शास्त्रज्ञांनी या प्राचीन दीर्घिकेला नॉर्स पौराणिक कथेतील लबाड देवावरून 'लोकी' असे नाव दिले आहे.
'मंथली नोटिस ऑफ द रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, युरोपियन स्पेस एजन्सीच्या 'गायिया' दुर्बिणीच्या मदतीने शास्त्रज्ञांनी २० अशा ताऱ्यांचा शोध लावला आहे, ज्यांच्यामध्ये धातूचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हे तारे आपल्या सूर्यमालेपासून सुमारे ७,००० प्रकाशवर्षे अंतरावर आहेत. रासायनिक रचनेनुसार हे सर्व तारे एकाच मूळ दीर्घिकेचे भाग असल्याचे स्पष्ट होते. या ताऱ्यांचे वय १० अब्ज वर्षांपेक्षा जास्त आहे.
या संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ. फेडेरिको सेस्टिटो यांनी सांगितले की, या ताऱ्यांची गती आणि दिशा अत्यंत चक्रावून टाकणारी आहे. यातील ११ तारे आकाशगंगेच्या फिरण्याच्या दिशेने, तर ९ तारे त्याच्या विरुद्ध दिशेने फिरत आहेत. सुरुवातीला याचे आकलन करणे कठीण होते; परंतु 'लोकी' नावाच्या एकाच दीर्घिकेच्या विलीनीकरणामुळे हे घडल्याचे समोर आले आहे.
शिकागो विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. अलेक्झांडर जी यांच्या मते, आकाशगंगा लहान दीर्घिकांना गिळंकृत करत आली आहे, ज्याला 'गॅलेक्टिक कॅनिबॅलिझम' म्हटले जाते. 'लोकी'चे हे विलीनीकरण इतके मोठे होते की, यामुळे आकाशगंगेच्या निर्मितीचा इतिहास आणि तिच्या उत्क्रांतीचा आतापर्यंतचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. हे संशोधन विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील रहस्ये उलगडण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.