वॉशिंग्टन ः दूध आणि दूग्धजन्य पदार्थांसाठी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक पर्याय निर्माण झालेले आहेत. मात्र, तरीही वनस्पतीजन्य उत्पादने डेअरीची बरोबर करू शकलेले नाहीत. गुड फूड इन्स्टिट्यूट (जीएफआय)च्या रिपोर्टनुसार सोयाबीन, बदाम आणि ओटस्सारख्या पदार्थांपासून बनवलेल्या वनस्पतीजन्य दुधाची अमेरिकेतील एकूण दूधविक्रीतील 15 टक्के आणि पश्चिम युरोपमधील 11 टक्के हिस्साच बनू शकलेले आहे. आता तर एका विशेष टाकीत साखर, पाणी आणि विशिष्ट जीवाणू सोडून दूध बनवले जात आहे!
70 लाख कोटी रुपयांच्या वैश्विक डेअरी बाजाराचा हिस्सा बनण्याच्या आशेसह काही कंपन्या गायी, म्हशी किंवा वनस्पतींशिवायच दूधनिर्मिती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सिंथेटिक डेअरीच्या या कंपन्या जैव-रासायनिक क्रियेने दूध बनवत आहेत. एका विशेष टाकीत साखर आणि पाण्यात काही जीवाणूंना सोडले जाते. हे जीवाणू काही वेळानंतर नियंत्रित वातावरणात साखरेचे रूपांतर दुधाच्या प्रोटिनमध्ये करतात. अशा प्रकारच्या दुधाचे काही लाभही आहेत. काही लोकांना दुधातील लॅक्टोसची अलर्जी असते. हे लॅक्टोस दुधातून बाहेर काढले जाऊ शकते. खाद्य सुरक्षा आणि हवामान बदलाविषयी सध्या जगभर चिंता वाढलेली आहे.
त्यामध्ये कमी पाण्याचा वापर होतो. पारंपरिक डेअरी उत्पादनांच्या तुलनेत त्यासाठी कमी ऊर्जा आणि जागेची गरज असते. ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जनही कमी होते जे या क्षेत्रात ग्लोबल वॉर्मिंगच्या उत्सर्जनात तीन टक्क्यांपेक्षा अधिक जबाबदार आहे. या प्रक्रियेत उपयोगात आणले जाणारे टँक अतिशय महागडे आहेत. सुमारे 30 लिटर दूध ज्या टँकमध्ये बनवले जाऊ शकते अशा टँकची किंमत दीड कोटी रुपयांपर्यंत असू शकते. मात्र, दीड लाख रुपयांमध्ये खरेदी केलेली एखादी गाय किंवा म्हैसही एका दिवसात इतके दूध देऊ शकते!