नवी दिल्ली : दैनंदिन बातम्यांमध्ये आपण ‘मिडल ईस्ट’ (मध्य-पूर्व) हा शब्द नेहमी ऐकतो. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे केंद्र असलेल्या या प्रदेशाचे नाव मात्र कोणत्याही भौगोलिक वैशिष्ट्यावरून नव्हे, तर 19 व्या शतकातील एका अमेरिकन नौदल अधिकार्याच्या द़ृष्टिकोनातून पडले आहे. आज हे नाव बदलून ‘पश्चिम आशिया’ म्हणून ओळखले जावे, असा प्रवाह जोर धरत आहे.
‘मिडल ईस्ट’ हे नाव 1902 मध्ये अल्फ्रेड थायर माहन या प्रसिद्ध अमेरिकन नौदल रणनीतीकाराने एका ब्रिटिश मासिकात पहिल्यांदा वापरले. त्यावेळी जगाचा नकाशा ‘युरोपाभिमुख’ होता, म्हणजेच लंडनपासून एखादे ठिकाण किती दूर आहे, यावरून त्याचे नाव ठरत असे : निअर ईस्ट : बाल्कन देश आणि ऑट्टोमन साम्राज्य. फार ईस्ट : चीन आणि जपानसारखे पूर्व आशियाई देश.
मिडल ईस्ट : भारत आणि पर्शियन आखाताच्या दरम्यानचा भाग, जो ब्रिटिशांच्या ‘मुकुटातील रत्न’ म्हणजेच भारतापर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचा होता. जगासाठी हा भाग ‘मिडल ईस्ट’ असला, तरी भारताने मात्र सुरुवातीपासून ‘पश्चिम आशिया’ हा शब्द वापरण्यावर भर दिला आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या नावाला चालना दिली. ‘मिडल ईस्ट’ हे नाव लंडनला केंद्रस्थानी धरून दिले गेले आहे. भारताचा ‘पश्चिम आशिया’ हा शब्द या प्रदेशाला ब्रिटनपासूनच्या अंतराऐवजी आशिया खंडातील त्याच्या खर्या स्थानानुसार ओळख देतो. हा केवळ भौगोलिक बदल नसून आशियाई अस्मिता आणि एकता जपण्याचा एक प्रयत्न आहे.
1939 मध्ये दुसर्या महायुद्धादरम्यान ब्रिटिशांनी कैरो येथे ‘मिडल ईस्ट कमांड’ची स्थापना केली. या लष्करी केंद्राचे नियंत्रण उत्तर आफ्रिकेपासून इराकपर्यंत होते. युद्धकाळातील बातम्यांमुळे ‘मिडल ईस्ट’ हा लष्करी शब्द जागतिक स्तरावर रूढ झाला आणि जुना ‘निअर ईस्ट’ हा शब्द मागे पडला. आजकाल जागतिक बँक आणि संयुक्त राष्ट्र (UN) सारख्या संस्था MENA (Middle East and North Africa) हा संक्षेप वापरतात. हा भाग केवळ सिनाई द्वीपकल्पापुरता मर्यादित नसून आफ्रिकेपर्यंत पसरला आहे, हे यातून स्पष्ट होते. मात्र, तरीही हे नाव पाश्चात्त्य देशांनी व्यापाराच्या द़ृष्टीने बनवलेले आहे, अशी टीका आजही केली जाते.