वॉशिंग्टन : एखाद्या ग्रहावर महाकाय लघुग्रह आदळल्यास त्या धडकेमुळे निर्माण होणार्या प्रचंड दबावातूनही ‘एक्स्ट्रिमोफाईल’ प्रकारचे जीवाणू वाचू शकतात, असे एका नवीन प्रयोगशाळेतील प्रयोगातून समोर आले आहे. या शोधामुळे, ग्रहांच्या टकरीतून परग्रहावरील जीवसृष्टी एका जगातून दुसर्या जगामध्ये पसरू शकते (Panspermia), या सिद्धांताला बळकटी मिळाली आहे.
3 मार्च रोजी ‘पीएनएएस नेक्सस’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, संशोधकांनी ‘डेईनोकोकस रेडिओडुरन्स’ (Deinococcus radiodurans) नावाच्या जीवाणूवर हा प्रयोग केला. हा जीवाणू अंतराळातील प्रतिकूल वातावरणात अनेक वर्षे जगण्यासाठी ओळखला जातो. संशोधकांनी हे जीवाणू स्टीलच्या दोन प्लेटस्मध्ये ठेवले आणि त्यावर अत्यंत वेगाने प्रचंड दबाव टाकला. मंगळासारख्या ग्रहावर जेव्हा एखादा लघुग्रह आदळतो, तेव्हा जेवढा दाब निर्माण होतो, तसाच दबाव येथे निर्माण करण्यात आला होता. संशोधकांनी 1.4 ते 2.9 गिगापास्कल (GPa) इतका दाब दिला. हा दाब पृथ्वीच्या समुद्रसपाटीवरील वातावरणीय दाबापेक्षा साधारण 14,000 ते 29,000 पटीने जास्त आहे. 2.4 GPa दाबावर सुमारे 60 टक्के जीवाणू जिवंत राहिले, तर 1.4 GPa दाबावर हे प्रमाण 95 टक्के इतके जास्त होते.
यापूर्वीच्या अभ्यासांच्या तुलनेत या जीवाणूंच्या जिवंत राहण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. हे जीवाणू किरणोत्सर्ग, कोरडेपणा आणि उच्च तापमान सहन करण्यास सक्षम असल्यामुळेच हे शक्य झाले असावे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. ‘डेइनोकोकस रेडिओडुरन्स’ हा जीवाणू अंतराळातील शून्यावकाश आणि कडाक्याची थंडी सहन करू शकतो. 2020 मधील एका अभ्यासात असे दिसून आले होते की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बाहेरील भागाला चिकटवलेले हे जीवाणू तीन वर्षांनंतरही जिवंत होते. धडकेनंतर हे जीवाणू स्वतःला कसे सावरतात, हे पाहण्यासाठी संशोधकांनी त्यांना 37 अंश सेल्सिअस तापमानात ठेवले.
तेव्हा असे आढळले की : 1. जीवाणूंनी नवीन पेशी तयार करण्याऐवजी, खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्यावर लक्ष केंद्रित केले. 2. त्यांनी जास्त प्रमाणात लोह शोषले आणि स्वतःच्या ‘डीएनए’ची दुरुस्ती केली. हा अभ्यास भविष्यातील ‘सॅम्पल-रिटर्न’ मिशनसाठी (दुसर्या ग्रहावरून नमुने पृथ्वीवर आणणे) अत्यंत महत्त्वा0चा आहे. जर लघुग्रहांच्या धडकेतून सूक्ष्मजीव एका ग्रहावरून दुसर्या ग्रहावर प्रवास करू शकत असतील, तर परग्रहावरील जीवसृष्टी पृथ्वीवर येऊन येथील पर्यावरणाचे नुकसान करू शकते. त्यामुळेच मंगळ किंवा इतर ग्रहांवरून येणार्या नमुन्यांची तपासणी करताना अधिक कडक खबरदारी घेण्याची गरज शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.