मेक्सिको सिटी : सायबर विश्वात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका अज्ञात हॅकरने चक्क एआय (एआय) चॅटबॉटस्ची दिशाभूल करून मेक्सिकोच्या अनेक सरकारी वेबसाईटस् आणि नेटवर्कमध्ये शिरकाव केला आहे. या सायबर हल्ल्यात सुमारे 150 गीगाबाईट अत्यंत संवेदनशील डेटा चोरी झाल्याचा दावा सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी केला आहे.
इस्रायली सायबर स्टार्टअप ‘गॅम्बिट सिक्युरिटी’च्या अहवालानुसार, हॅकरने अँथ—ोपिक कंपनीच्या ‘क्लाऊड’ या चॅटबॉटला स्पॅनिश भाषेत सूचना दिल्या. त्याने चॅटबॉटला आपण एका कायदेशीर ‘बग बाऊंटी’ (प्रणालीतील त्रुटी शोधणे) प्रोग्राममध्ये काम करत असल्याचे सांगून फसवले. एआयला वाटले की, तो एका कायदेशीर कामात मदत करत आहे. हॅकरने एआयला सरकारी वेबसाईटस्मधील त्रुटी शोधणे, स्क्रिप्ट तयार करणे आणि डेटा चोरीची प्रक्रिया ऑटोमेट करण्याचे आदेश दिले. जेव्हा ‘क्लाऊड’कडून माहिती मिळणे कठीण झाले, तेव्हा त्याने ‘ChatGPT’ ची मदत घेऊन नेटवर्कमध्ये पुढे कसे जायचे, याचे मार्गदर्शन घेतले.
चोरी झालेल्या 150 जीबी डेटामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती समाविष्ट असल्याचे म्हटले जात आहे. सुमारे 19 कोटी करदात्यांचे रेकॉर्डस्, मतदार यादी आणि सरकारी कर्मचार्यांची ओळखपत्रे, नागरी नोंदणी फाईल्स यांचा यामध्ये समावेश आहे. हा हल्ला डिसेंबरमध्ये सुरू झाला आणि सुमारे महिनाभर सुरू होता. मेक्सिकोचे राष्ट्रीय निवडणूक संस्था आणि कर प्राधिकरण या हल्ल्याचे मुख्य लक्ष्य होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर एआय कंपन्यांनी तातडीने पावले उचलली आहेत: OpenAI: ज्या खात्यांनी धोरणांचे उल्लंघन केले, त्यांना बॅन करण्यात आले आहे. Anthropic: संबंधित हॅकरची खाती बंद करण्यात आली आहेत. कंपनीने म्हटले आहे की, त्यांचा नवीन मॉडेल ‘Claude Opus 4.6’ अशा गैरवापरांना रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा फीचर्ससह सज्ज आहे.