वॉशिंग्टन : सुमारे 56,000 वर्षांपूर्वी अमेरिकेतील अॅरिझोनामध्ये झालेल्या एका महाभयंकर उल्कापाताने केवळ बॅरिंजर क्रेटर (उल्का विवर) तयार केले नाही, तर त्याचे धक्के 160 किलोमीटर दूर असलेल्या ग्रँड कॅनियनपर्यंत पोहोचले. या धक्क्यांमुळे एक मोठी दरड कोसळून कोलोरॅडो नदीचा प्रवाह अडला गेला असावा, असा निष्कर्ष एका नवीन अभ्यासातून समोर आला आहे.
बॅरिंजर क्रेटर, ज्याला ‘मेटिअर क्रेटर’ असेही म्हटले जाते, हे सुमारे 53,000 ते 63,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर एका प्रचंड उल्केच्या आघाताने तयार झाले. या आघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की, त्याचे तरंग 100 मैलांपेक्षा जास्त (सुमारे 160 किलोमीटर) दूर असलेल्या ग्रँड कॅनियनपर्यंत पोहोचले. शास्त्रज्ञांच्या मते, याच धक्क्यांमुळे कॅनियनमधील एक संपूर्ण कडा कोसळून नदीत पडला असावा. ‘जिओलॉजी’ या जर्नलमध्ये 15 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या या संशोधनाने दोन अशा मोठ्या घटनांना जोडले आहे, ज्या आतापर्यंत पूर्णपणे भिन्न मानल्या जात होत्या.
या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि न्यू मेक्सिको विद्यापीठातील पृथ्वी आणि ग्रह विज्ञान विभागाचे प्राध्यापक कार्ल कार्लस्ट्रॉम यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘उल्कापाताच्या घटनेनंतर हजार वर्षांच्या आत एखादी दरड नैसर्गिकरीत्या कोसळणे किंवा स्थानिक भूकंप होणे यासारख्या इतर शक्यता नाकारता येत नाहीत. मात्र, या दोन्ही घटना अत्यंत कमी कालावधीत घडल्या आहेत, ज्यामुळे त्या एकमेकांशी संबंधित असण्याची शक्यता वाढते.
‘संशोधकांना हे आधीपासूनच माहीत होते की, प्लेइस्टोसीन युगाच्या उत्तरार्धात (1,29,000 ते 11,700 वर्षांपूर्वी) कोलोरॅडो नदीला महापूर आला होता, ज्यामुळे ग्रँड कॅनियनचा मोठा भाग पाण्याखाली गेला होता. याचा पुरावा 1960 च्या दशकात कार्लस्ट्रॉम यांच्या वडिलांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी ‘स्टँटन केव्ह’ नावाच्या गुहेत केलेल्या उत्खननात सापडला होता. त्यांना तिथे पाण्यासोबत वाहून आलेल्या लाकडापासून बनवलेल्या प्राण्यांच्या लहान मूर्ती सापडल्या होत्या. त्या काळातील तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रज्ञांनी ते लाकूड 35,000 वर्षांपेक्षा जुने असल्याचे सांगितले होते.