टोरांटो : पृथ्वीवर अनेकवेळा आकाशातून उल्कापात होत असतो. आता कॅनडाच्या चार्लोटटाऊन नावाच्या शहरात अशीच एक उल्का कोसळली. ही उल्का एका घराच्या अंगणात कोसळली व ती कोसळत असताना घराच्या डोअरबेल कॅमेर्यात कैदही झाली. जगातील अशा प्रकारचा हा पहिलाच व्हिडीओ आहे.
जो वेलाइडम आणि लॉरा केली या जोडप्याच्या घरासमोर ही उल्का कोसळली. हे दोघे आपल्या कुत्र्यांना फिरवून आणण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी आपल्या घरासमोर एक अनोखी घटना घडेल, याची त्यांना कल्पनाही नव्हती. ते ज्यावेळी परतले त्यावेळी घरासमोरील रस्त्यावर व आसपास खडक-मातीचा व राखेचा ढिगारा पसरलेला त्यांना दिसला. हा कसला ढिगारा पडला आहे, हे त्यांना कळेना! शेजारच्या माणसाने एक मोठा आवाज आल्याचेही त्यांना सांगितले. त्यावेळी वेलाइडम यांनी सेक्युरिटी कॅमेर्याचे फुटेज तपासले. त्यावेळी डोअरबेल कॅमेराने टिपलेल्या व्हिडीओवरून हे समजले की, घराबाहेर एक उल्का कोसळली होती. एखाद्या डोअरबेल कॅमेर्यात उल्कापाताचे द़ृश्य टिपण्याची ही पहिलीच वेळ आहे. अल्बर्टा युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि उल्का संग्रहाचे क्युरेटर ख्रिस हर्ड यांनी सांगितले की, एखादी उल्का कोसळण्याचा आवाज आणि व्हिडीओ एकत्र रेकॉर्ड होण्याचे हे एक दुर्मीळ उदाहरण आहे.