वॉशिंग्टन : आता इंस्टाग्राम आणि फेसबुक रील्स समजून घेणे आणखी सोपे झाले आहे. सोशल मीडिया कंपनी ‘मेटा’ने आपले एआय-पॉवर्ड व्हिडीओ ट्रान्सलेशन फीचर आता हिंदी आणि पोर्तुगीज भाषांसाठीही सुरू केले आहे. यामुळे क्रिएटर्स त्यांच्याच आवाजात त्यांचे व्हिडीओ इतर भाषांमध्ये स्वयंचलितपणे डब करू शकतील आणि रील्स पाहणारे युजर्स त्यांच्या पसंतीच्या भाषेत रील्स पाहू शकतील. या फीचरची घोषणा मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एका व्हिडीओद्वारे केली. त्यांनी सांगितले की, आता रील्सचे भाषांतर हिंदी, पोर्तुगीज, इंग्रजी आणि स्पॅनिश भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि येत्या काळात यात आणखी भाषा जोडल्या जातील.
प्रत्येक भाषांतरित रीलवर ‘Translatd with Meta AI’ असा टॅग दिसेल, ज्यामुळे युजर्सना कळेल की ते ‘एआय’द्वारे भाषांतरित केलेला व्हिडीओ पाहत आहेत. मेटाचे म्हणणे आहे की, हे फीचर केवळ भाषेचा अडथळा दूर करणार नाही, तर क्रिएटर्सना जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘अनेक क्रिएटर्सना जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचे असते. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही हे फीचर सुरू केले आहे, जेणेकरून ते त्यांच्या रील्स वेगवेगळ्या भाषांमध्ये सहज शेअर करू शकतील.’ मेटाचे हे फीचर क्रिएटरचा आवाज आणि टोन ओळखून त्याचे दुसर्या भाषेत भाषांतर करते.
यामुळे व्हिडीओ पाहताना असे वाटते की, क्रिएटर स्वतःच नवीन भाषेत बोलत आहे. क्रिएटर इच्छुक असल्यास लिप-सिंकिंग ऑन करू शकतात, ज्यामुळे त्यांच्या बोलण्याची शैली भाषांतरित आवाजाशी जुळेल. तसेच, दर्शकांकडे "Don't Translate’ (भाषांतर करू नका) हा पर्यायही उपलब्ध असेल, ज्यामुळे भाषेत कोणताही बदल होणार नाही. ही सुविधा सध्या सर्व इंस्टाग्राम पब्लिक अकाऊंटस् आणि फेसबुक क्रिएटर्स (ज्यांचे 1,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत) यांच्यासाठी उपलब्ध आहे. मेटाने या फीचरची सुरुवात ऑगस्टमध्ये फक्त इंग्रजी आणि स्पॅनिश भाषांमध्ये केली होती.
आता हिंदी आणि पोर्तुगीज भाषा जोडल्यामुळे कंपनी आपल्या दोन मोठ्या बाजारपेठा भारत आणि ब्राझीलला लक्ष्य करत आहे. मेटाचे म्हणणे आहे की, यामुळे रील्स क्रिएटर्सना नवीन देशांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास आणि रील्सची व्ह्यूअरशिप वाढविण्यात मदत होईल. मेटाने सांगितले की, कंपनी आता रील्सवरील कॅप्शन आणि टेक्स्ट स्टिकर्ससाठी देखील भाषांतर फीचर तयार करत आहे. युजर्सना लवकरच "Translate Text on Reels' (रील्सवरील मजकूर भाषांतरित करा) चा नवीन पर्याय मिळेल, ज्यामुळे ते मजकूरदेखील त्यांच्या भाषेत पाहू शकतील.