नवी दिल्लीः लग्नसमारंभ असो, एखादा कार्यक्रम असो किंवा पूजा-पाठ अन् सण-उत्सव; भारतीय महिलांच्या केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा आवर्जून माळला जातो. विशेषतः दक्षिण भारतातील महिला आपल्या केसांत गजरा नक्की माळतात. बहुतांश महिलांना असे वाटते की गजरा हा केवळ शृंगार आणि केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी माळला जातो. मात्र, यामागे एक मोठे वैज्ञानिक आणि मानसिक आरोग्याशी जोडलेले रहस्य दडले आहे. मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध आपल्या मेंदूवर, मज्जासंस्थेवर आणि मूडवर कसा सकारात्मक परिणाम करतो, ते जाणून घेऊया...
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) मते, मोगऱ्याच्या फुलांतून येणारा सुगंध मेंदूला शांतता प्रदान करतो. जेव्हा गजरा केसांमध्ये बांधला जातो, तेव्हा त्याचा सुगंध नाकावाटे शरीरात प्रवेश करतो. हा सुगंध मेंदूतील ‘सेरोटोनिन’ आणि ‘डोपामाइन’सारख्या आनंदाची भावना निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी वाढवतो. ज्यामुळे मानसिक अस्वस्थता, चिंता आणि ताणतणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी झपाट्याने कमी होते. याच्या मदतीने मन त्वरित शांत होते आणि मूड चांगला राहतो. धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला मानसिक थकवा जाणवतो.
अशा वेळी महिला जेव्हा केसांमध्ये ताजा गजरा माळतात, तेव्हा मोगऱ्याचा सुगंध आळस आणि मानसिक थकवा दूर करतो. अरोमाथेरपी तज्ज्ञांच्या मते, मोगऱ्याच्या फुलांमधून निघणारे नैसर्गिक सुगंधी घटक मेंदूला ताजेतवाने करण्यासोबतच मूड स्विंग्स आणि चिडचिड कमी करण्यास मदत करतात. आयुर्वेदानुसार, मोगऱ्याच्या फुलांमध्ये थंड गुणधर्म असतात. टाळूजवळ गजरा माळल्याने ही फुले डोक्याला थंडावा देतात. यातून येणारा मंद सुगंध शिरांमधील ताण कमी करून डोकेदुखीपासून आराम देतो. यासोबतच या मंद सुगंधामुळे रात्री गाढ आणि चांगली झोप येण्यासही मदत होते.