उदयपूर : सकाळच्या धुक्यातून जेव्हा सूर्यकिरण तलावांवर पडतात, तेव्हा राजस्थानमधील मेनार गावाचे आकाश शेकडो पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि पंखांच्या फडफडाटाने जिवंत होते. हे आहे राजस्थानचे बर्ड व्हिलेज अर्थात पक्षांचे गाव. येथे येणारा प्रत्येक पक्षी पाहुणा नसून, कुटुंबाचा एक अविभाज्य सदस्य मानला जातो.
मेनारचे वैशिष्ट्य केवळ येथील जैवविविधता नाही, तर येथील लोक आहेत, जे पक्षी मित्र म्हणून ओळखले जातात. एकेकाळी प्रत्येक पक्ष्याला बदक समजणारी लहान मुले आज जवळपास प्रत्येक पक्ष्याला नावाने ओळखतात आणि त्यांची काळजीही घेतात.
पक्ष्यांविषयीचे हे प्रेम आजचे नाही. सांगितले जाते की, 1832 मध्ये एका ब्रिटिश अधिकार्याने येथील तलावाजवळ एका पक्ष्याची शिकार केली, तेव्हा संतप्त गावकर्यांनी त्याला गावातून हाकलून दिले होते. ही कथा आजही मेनारच्या नव्या पिढीला प्रेरणा देत आहे. याच प्रेरणेतून गावकर्यांनी हळूहळू गावातील ब्रह्म तलाव, धंध तलाव आणि खेडोदा तलाव यांना पक्ष्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनवले.
गावकर्यांच्या याच एकत्रित प्रयत्नांमुळे मेनारला राजस्थानचे पहिले बर्ड व्हिलेज म्हणून घोषित करण्यात आले. इतकेच नव्हे, तर 2023 मध्ये या गावाने भारताच्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाच्या यादीतही आपले नाव नोंदवले आहे.