रोम : सध्याच्या ‘एआय’च्या जमान्यात काय घडेल हे काही सांगता येत नाही. ‘डीपफेक’मुळे तर जगभरातील अनेक नेते आणि सेलिब्रिटींची झोप उडवली आहे. भारतातील निवडणुकांमध्येही याचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले होते. आता अशा पार्श्वभूमीवर ‘एआय’ द्वारे आवाजाची होणारी हुबेहूब नक्कल रोखण्यासाठी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ‘व्हॉईस ट्रेडमार्क’चा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भविष्यातील सायबर सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षणाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
‘एआय’ आणि ‘डीपफेक’ तंत्रज्ञानाचा वाढता गैरवापर पाहता, आता केवळ युजर्सचे फोटो आणि व्हिडीओच नाही, तर मानवी आवाजावरही सायबर दरोडा पडण्याची गंभीर भीती निर्माण झाली आहे. या वाढत्या डिजिटल धोक्यापासून स्वतःचा कायदेशीर बचाव करण्यासाठी मेलोनी यांनी एक अत्यंत ऐतिहासिक आणि अनोखे पाऊल उचलले आहे. त्यांनी थेट युरोपियन युनियनच्या बौद्धिक संपदा कार्यालयाकडे (European Union Intellectual Property Office - EUIPO) स्वतःच्या आवाजाचा पेटंट म्हणजेच ‘व्हॉईस ट्रेडमार्क’ मिळवण्यासाठी अधिकृत अर्ज दाखल केला आहे.
रिपोर्टनुसार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी केलेल्या या अर्जासोबत मेलोनी यांनी ४ सेकंदांची एक ऑडिओ क्लिप जोडली आहे, ज्यामध्ये त्या इटालियन भाषेत ‘‘इओ सोनो जॉर्जिया मेलोनी’’ (मी जॉर्जिया मेलोनी आहे) असे दोनदा म्हणताना ऐकू येत आहेत. कोणत्याही जागतिक सर्वोच्च नेत्याने एआय, डीपफेक आणि व्हॉईसक्लोनिंगशी लढण्यासाठी आपल्या आवाजाचे ट्रेडमार्क करण्याचे हे जगातील पहिलेच मोठे प्रकरण आहे.
सायबर सुरक्षा आणि तंत्रज्ञान तज्ञांच्या मते, आजचे प्रगत एआय अल्गोरिदम कोणत्याही व्यक्तीचा अवघ्या काही सेकंदांचा ऑडिओ नमुना ऐकून त्याच्या आवाजाची १०० टक्के अचूक नक्कल करू शकतात. याला तांत्रिक भाषेत ‘व्हॉईस क्लोनिंग’ म्हटले जाते. जागतिक नेत्यांच्या खोट्या आवाजातील ऑडिओ क्लिप्स किंवा व्हिडीओ तयार करून निवडणुकांमध्ये मतदारांची दिशाभूल केली जाऊ शकते, जी लोकशाही आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत घातक आहे. स्वतः मेलोनी यापूर्वी ऑनलाईन अश्लील डीपफेक व्हिडीओ आणि फोटोंच्या शिकार ठरल्या आहेत.