Melania Trump & robot entry | व्हाईट हाऊसमध्ये मेलानिया ट्रम्प यांची ‘रोबो’सोबत एन्ट्री! 
विश्वसंचार

Melania Trump & robot entry | व्हाईट हाऊसमध्ये मेलानिया ट्रम्प यांची ‘रोबो’सोबत एन्ट्री!

अमेरिकन ह्युमनॉईडने वेधले जगाचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये एका अनोख्या पाहुण्यासोबत प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा पाहुणा दुसरा कोणी नसून ‘फिगर 03’ नावाचा एक प्रगत ‘ह्युमनॉईड’ (मानवासारखा दिसणारा) रोबो आहे.

‘फॉस्टरिंग द फ्युचर टुगेदर ग्लोबल कोलिशन समिट’च्या दुसर्‍या दिवशी मेलानिया ट्रम्प यांनी 40 हून अधिक देशांच्या प्रतिनिधींचे स्वागत केले. यावेळी त्या रेड कार्पेटवर अमेरिकेने विकसित केलेल्या या रोबोसोबत चालताना दिसल्या. या रोबोने 11 भाषांमध्ये उपस्थितांचे स्वागत करत म्हटले, ‘तंत्रज्ञान आणि शिक्षणाद्वारे मुलांना सक्षम करण्याच्या या ऐतिहासिक चळवळीचा भाग होताना मला अभिमान वाटत आहे.’

यावर प्रतिक्रिया देताना मेलानिया ट्रम्प म्हणाल्या, ‘व्हाईट हाऊसमध्ये माझे पहिले अमेरिकन बनावटीचे ह्युमनॉईड पाहुणे म्हणून तुमचे स्वागत करताना मला आनंद होत आहे.’ मेलानिया ट्रम्प यांनी यावेळी भविष्यातील शिक्षणाबद्दल महत्त्वाचे भाष्य केले. त्या म्हणाल्या की, नजीकच्या भविष्यात ह्युमनॉईड शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गतीनुसार आणि त्यांच्या ‘भावनिक स्थितीनुसार’ गणित, इतिहास आणि इतर विषयांचे वैयक्तिकृत शिक्षण देऊ शकतील. हा रोबो सिलिकॉन व्हॅलीमधील ‘फिगर एआय’ या कंपनीने विकसित केला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये याची तिसरी पिढी लाँच करण्यात आली होती. हा रोबो ‘हेलिक्स’ नावाच्या एआय इंजिनवर चालतो, ज्यामुळे तो स्वतःहून अनेक कामे करू शकतो. या प्रगत रोबोची किंमत सुमारे 25,000 डॉलर्स (अंदाजे 21 लाख रुपये) आहे. दोन दिवसांच्या या जागतिक शिखर परिषदेत 45 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले असून, तंत्रज्ञानाचा मानवी कल्याणासाठी कसा वापर करता येईल, यावर चर्चा करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT