World’s Largest Anaconda | जगातील सर्वात मोठा ॲनाकोंडा ‘ॲना ज्युलिया’  
विश्वसंचार

World’s Largest Anaconda | जगातील सर्वात मोठा ॲनाकोंडा ‘ॲना ज्युलिया’

पुढारी वृत्तसेवा

ब्राझिलिया : २०२४ च्या सुरुवातीला ब्राझीलमधील 'फॉर्मोसो’ नदीच्या परिसरातून अशी बातमी समोर आली, ज्याने वैज्ञानिकांसह संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. शोधकर्त्यांना येथे एक महाकाय 'नॉर्दर्न ग्रीन ॲनाकोंडा' आढळला, ज्याला पुढे 'ॲना ज्युलिया' असे नाव देण्यात आले. सुमारे २६ फूट लांब आणि तब्बल २०० किलोग्रॅम वजनाचा हा साप आतापर्यंतच्या नोंदींमधील सर्वात मोठ्या ॲनाकोंडांपैकी एक मानला गेला. एका सर्वसामान्य ॲनाकोंडापेक्षा या सापाचा आकार खूपच मोठा असल्याने या दुर्मीळ शोधाने वैज्ञानिकांनाही चक्रावून टाकले. याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि बघता बघता ही संपूर्ण जगात चर्चेची बाब बनली.

‘ॲना ज्युलिया'बाबत तिच्या अथांग शरीरासोबतच तिच्या डोक्याचीही सर्वाधिक चर्चा झाली. वैज्ञानिकांच्या मते, तिचे डोके इतके रुंद होते की अनेकांनी त्याची तुलना एका प्रौढ माणसाच्या डोक्याच्या आकाराशी केली. सुमारे ८ मीटर (२६ फूट) लांब असलेला हा साप आपल्या प्रजातीतील सर्वात असाधारण जीवांमध्ये गणला गेला. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, इतक्या अवाढव्य आकाराचा ॲनाकोंडा मिळणे ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. 'ॲना ज्युलिया' हा केवळ एक महाकाय साप नव्हता, तर वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा पुरावा होता. ज्या प्रजातीशी ती संबंधित होती, त्या 'नॉर्दर्न ग्रीन ॲनाकोंडा' (Eunectes akayima) या प्रजातीला दीर्घ अभ्यासानंतर २०२४ मध्येच एका वेगळ्या प्रजाती म्हणून औपचारिक मान्यता मिळाली होती.

त्यामुळे एवढ्या मोठ्या आणि निरोगी ॲनाकोंडाचा शोध लागणे म्हणजे तिची जनुकीय विविधता (Genetic Diversity), शारीरिक विकास आणि नैसर्गिक अधिवास समजून घेण्याची वैज्ञानिकांसाठी मोठी संधी होती. संपूर्ण जग या शोधाचा आनंद साजरा करत असतानाच, काही आठवड्यांनंतर मार्च २०२४ मध्ये 'ॲना ज्युलिया' ब्राझीलच्या फॉर्मोसो नदीत मृत अवस्थेत आढळून आली. या बातमीने वन्यजीव तज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमींना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकाऱ्यांनी तिच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी सुरू केली. सोशल मीडियावर याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले गेले; मात्र तपास पूर्ण होण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यास नकार दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT