वॉशिंग्टन : खगोलशास्त्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन तारे, एक महाकाय तारा (सुपरजाएंट) आणि सूर्यापेक्षा किंचित लहान तारा, एकमेकांत विलीन होताना थेट टिपण्यात आले आहेत. हजारो वर्षे एकमेकांभोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर, ही जोडी अवघ्या सात वर्षांपेक्षा कमी काळात एकत्र आली. हा कालावधी इतका अल्प होता की, संशोधकांना हा संपूर्ण नाट्यमय घटनाक्रम सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता आला. या महत्त्वपूर्ण शोधाची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात १८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात देण्यात आली आहे.
‘‘ताऱ्यांचे विलीनीकरण अचूकपणे वर्तवता येत नसल्याने ते प्रत्यक्ष घडताना पाहणे अत्यंत कठीण असते,’’ असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि कोलंबिया विद्यापीठातील खगोल भौतिकशास्त्रज्ञ विराज करंबेळकर यांनी नासाच्या निवेदनात म्हटले आहे. ‘‘मात्र, २०२३ मध्ये आम्हाला काहीतरी असामान्य घडत असल्याचे जाणवले आणि पुढे काय होते हे पाहण्यासाठी आम्ही या प्रणालीवर सतत नजर ठेवली.’’ या ताऱ्यांच्या संभाव्य विलीनीकरणाची पहिली चाहूल नासाच्या आता निवृत्त झालेल्या ‘निअर-अर्थ ऑब्जेक्ट वाईड-फील्ड इन्फ्रारेड सर्व्हे एक्स्प्लोरर’ (NEOWISE) या अंतराळयानाला लागली. लघुग्रह शोधण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या यानाने रात्रीच्या आकाशातील इतरही अनेक रंजक बदल टिपले होते.
आपल्या सर्वात जवळच्या मोठ्या आकाशगंगेत, अँड्रोमेडा (देवयानी) आकाशगंगेत, पूर्वी स्थिर असलेली एक द्वि-तारा प्रणाली (बायनरी स्टार सिस्टीम) अधिक तेजस्वी होऊ लागल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. त्यानंतर कॅलिफोर्नियातील पालोमार वेधशाळेतील ‘वाईड-फिल्ड इन्फ्रारेड ट्रान्झिएंट एक्स्प्लोरर’ या नियर-इन्फ्रारेड उपकरणाद्वारे केलेल्या निरीक्षणातून तेथून धूळ बाहेर पडत असल्याचेही स्पष्ट झाले. डिसेंबर २०२५ मध्ये करंबेळकर यांच्या पथकाने ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ च्या माहितीच्या आधारे या निरीक्षणांची पुष्टी केली. संशोधकांनी या द्वि-तारा जोडीला ‘बाओ’ (अधिकृत नाव AT 2025abao) असे नाव दिले आणि त्यांचा मागोवा घेणे सुरू ठेवले. २०१८ च्या सुमारास ‘बाओ’मधील लहान तारा महाकाय ‘बाओ’ ताऱ्याच्या पृष्ठभागावर आदळल्याचे त्यांना आढळले. येथून पुढे घडामोडी वेगाने घडल्या. ‘कॉमन एन्व्हलप इव्होल्यूशन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेत दोन्ही ताऱ्यांमध्ये वायूंची देवाण-घेवाण सुरू झाली.
मोठ्या ‘बाओ’ ताऱ्याने आपल्या लहान सहकाऱ्याला अधिकाधिक जवळ खेचले आणि शेवटी त्याला आपल्या गाभ्यात ओढून घेतले; ज्यामुळे प्रचंड मोठी ऊर्जा बाहेर पडली. या नाट्यमय परिणामाचे वर्णन करताना सहलेखक आणि कोलंबिया विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ किशालय दे म्हणाले की, हा प्रकार ‘‘एखाद्या जिवंत ताऱ्याच्या आत बॉम्बचा स्फोट होण्यासारखा होता.’’ या घटनेच्या वेगाइतकाच तिचा निकालही संशोधकांसाठी आश्चर्यकारक ठरला. ‘बाओ’चा शेवट सुपरनोव्हा स्फोटात होणे, त्याचे न्यूट्रॉन ताऱ्यात रूपांतर होणे किंवा त्याचे कृष्णविवरात (ब्लॅक होल) कोसळणे सहज शक्य होते. मात्र, त्याऐवजी ही प्रणाली पुन्हा एका एकसंध महाकाय ताऱ्यात स्थिरावल्याचे दिसते. या ‘कॉस्मिक कॅनिबलिझम’ (अंतराळातील स्वजातीभक्षण) नंतर हा नवा, पुनरुज्जीवित झालेला ‘बाओ’ तारा कसा टिकून राहतो, याची माहिती भविष्यातील निरीक्षणातून शास्त्रज्ञांना मिळणार आहे.