Norway silver coins treasure | नॉर्वेमध्ये सापडला चांदीच्या नाण्यांचा महाखजिना 
विश्वसंचार

Norway silver coins treasure | नॉर्वेमध्ये सापडला चांदीच्या नाण्यांचा महाखजिना

पुढारी वृत्तसेवा

ओस्लो : नॉर्वेमधील पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी ‌’वायकिंग‌’ युगातील चांदीच्या नाण्यांचा एक प्रचंड साठा शोधला आहे. यामध्ये इंग्लंड, जर्मनी, डेन्मार्क आणि नॉर्वेमध्ये बनवलेली एकूण २,९७० चांदीची नाणी सापडली असून, हा नॉर्वेच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा नाण्यांचा खजिना ठरला आहे. विशेष म्हणजे, अद्यापही या ठिकाणी खोदकाम सुरू आहे.

१० एप्रिल रोजी पूर्व नॉर्वेमधील रेना गावाजवळील एका शेतात दोन व्यक्ती मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने शोध घेत होत्या. त्यांना सुरुवातीला १९ नाणी सापडली. त्यांनी तातडीने स्थानिक पुरातत्त्व विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर शास्त्रज्ञांनी केलेल्या सखोल संशोधनात हा हजारो नाण्यांचा साठा उजेडात आला. ज्या शेतात हा साठा सापडला, त्यावरून याला ‌‘मोरस्टाड होर्ड‌’ असे नाव देण्यात आले आहे. ओस्लोमधील सांस्कृतिक इतिहास संग्रहालयातील तज्ज्ञ सध्या या नाण्यांची तपासणी करत आहेत. या खजिन्यात खालील महत्त्वाच्या राजांच्या काळातील नाणी आहेत. एथेलरेड दुसराब : इंग्लंडचा राजा (९७८-१०१६). कॅन्युट द ग्रेट इंग्लंड, डेन्मार्क आणि नॉर्वेचा राजा (१०१६-१०३५). ओटो तिसरा : पवित्र रोमन समाट (९९६-१००२).

हॅराल्ड हार्ड्राडा : नॉर्वेचा राजा, ज्याच्या काळात नाणी सापडण्याचा काळ साधारण इसवी सन १०५० असावा असा अंदाज आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते, हा खजिना केवळ लुटालुटीतून जमा केलेला नसावा. त्या काळी स्कॅन्डिनेव्हियामधील दलदलीच्या भागातून लोखंड काढण्याचे मोठे उद्योग चालत असत. हे लोखंड युरोपमध्ये निर्यात केले जात असे आणि त्या बदल्यात ही परदेशी नाणी नॉर्वेमध्ये आली असावीत. ९०० ते १२५० च्या दरम्यान या भागात लोखंडाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असे.

पुरातत्वशास्त्रज्ञ मे-टोव्ह स्मिसेथ यांनी सांगितले की, ‌‘हे नाणे साठवणुकीसाठी वापरलेले मातीचे वातावरण अतिशय पोषक असल्याने नाणी चांगल्या स्थितीत जतन झाली आहेत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत असा अनुभव एकदाच येतो.‌‘नाण्यांसोबतच चांदीच्या दागिन्यांचे काही तुकडेही सापडले आहेत, ज्यांचा वापर मध्ययुगात चलनासारखा केला जात असे. यापूर्वी नॉर्वेमध्ये जास्तीत जास्त २,००० नाण्यांचे साठे सापडले होते, मात्र ३,००० च्या जवळ जाणारा हा आकडा एक नवा विक्रम आहे. संशोधक अजूनही या परिसरात जुन्या वस्त्यांचे पुरावे शोधत आहेत, जेणेकरून त्या काळातील लोकांच्या जीवनशैलीवर अधिक प्रकाश पडू शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT