वॉशिंग्टन : अमेरिकेतील युटा राज्याच्या प्रसिद्ध ‘ग्रेट सॉल्ट लेक’ या क्षारांनी भरलेल्या सरोवराखाली गोड्या पाण्याचा एक विस्तीर्ण साठा शास्त्रज्ञांना सापडला आहे. एका नवीन अभ्यासानुसार, हा गोड्या पाण्याचा जलाशय संपूर्ण सरोवराच्या क्षेत्रापेक्षाही मोठा असू शकतो, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ युटा येथील भूविज्ञान आणि भूभौतिकीचे प्राध्यापक आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक मायकल झ्दानोव यांनी सांगितले की, सरोवराच्या पूर्व किनारपट्टीखाली विशिष्ट ठिकाणी हा साठा सुमारे 2.5 मैल (4 किलोमीटर) खोलीपर्यंत पसरलेला आहे. अलिकडच्या वर्षांत या कोरड्या पडलेल्या भागावर लव्हाळ्यांसारख्या वनस्पतींनी झाकलेले काही अनाकलनीय उंचवटे उगवले होते, ज्याने शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले होते. हा पाण्याचा साठा किती मोठा आहे, हे जर भविष्यातील अभ्यासातून सिद्ध झाले, तर त्याचा उपयोग सरोवराचे अस्तित्व वाचवण्यासाठी होऊ शकतो. सरोवराचा तळ कोरडा पडल्यामुळे तिथे भेगा पडत आहेत आणि त्यातून विषारी धूळ हवेत पसरत आहे. हे गोडे पाणी या समस्येवर उपाय ठरू शकते.
सरोवराच्या आग्नेय कोपर्यातील फार्मिंग्टन बे भागात ‘फ्रेग्माइटस्’ नावाच्या वनस्पतींची दाट झुडपे वाढली होती. या वनस्पतींना वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याची गरज असते. यावरूनच शास्त्रज्ञांना संशय आला की, जमिनीखाली कुठूनतरी गोड्या पाण्याचा पुरवठा होत असावा. या भूगर्भीय रचनेचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी सुमारे 10 चौरस मैल क्षेत्रात हवाई इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्वेक्षण केले. एका हेलिकॉप्टरला लटकवलेल्या गोलाकार उपकरणाद्वारे जमिनीखाली विद्युत चुंबकीय लहरी पाठवण्यात आल्या.
त्या लहरी परावर्तित होऊन परत आल्यानंतर मिळणार्या डेटावरून जमिनीखालील पाण्याचा नकाशा तयार करण्यात आला. ‘ग्रेट सॉल्ट लेक’ हे अंदाजे 1700 चौरस मैल क्षेत्रात पसरलेले खार्या पाण्याचे सरोवर आहे. क्षारयुक्त पाणी वीजवाहक असल्याने विद्युत चुंबकीय लहरी सरोवराच्या तळापर्यंत पोहोचून स्पष्ट माहिती देऊ शकतील की नाही, याबाबत संशोधक साशंक होते. मात्र, हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी ठरला असून, भूगर्भातील गोड्या पाण्याचे मोठे अस्तित्व समोर आले आहे.