विश्वसंचार

गुरुत्वाकर्षणासाठी वस्तुमान नाही गरजेचे!

Arun Patil

वॉशिंग्टन : विज्ञान सांगते की, गुरुत्वाकर्षण आणि वस्तुमान म्हणजेच 'ग्रॅव्हिटी' आणि 'मास' यांचा परस्पर संबंध असतो. वस्तुमान असल्याशिवाय गुरुत्वाकर्षण असू शकत नाही. सर आयझॅक न्यूटन आणि अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी गुरुत्वाकर्षणाशी संबंधित महत्त्वाचे सिद्धांत दिलेले आहेत. आता एका वैज्ञानिकाने या सिद्धांतांनाच आव्हान दिले आहे. हंटस्विलेमधील अलाबामा विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ रिचर्ड लियू यांनी म्हटले आहे की, वस्तुमानाशिवायही गुरुत्वाकर्षणाचे अस्तित्व असू शकते. लियू यांचे हे संशोधन थेटपणे डार्क मॅटरच्या अस्तित्वाला नाकारते.

ब्रह्मांडाचा बहुतांश भाग हा अद़ृश्य अशा डार्क मॅटरने व्यापलेला असल्याचे म्हटले जाते. हे एक काल्पनिक, अद़ृश्य वस्तुमान आहे जे ब्रह्मांडाच्या एकूण वस्तुमानाचा 85 टक्के हिस्सा मानले जाते. मुळात त्याची संकल्पना वेगाने फिरत असलेल्या, एकसाथ राहणार्‍या आकाशगंगांना समजून घेण्यासाठी मांडण्यात आली होती. अर्थात, डार्क मॅटरला आतापर्यंत थेटपणे किंवा प्रत्यक्षपणे कधीही पाहण्यात आलेले नाही. त्यामुळे वैज्ञानिकांनी आता सध्याच्या सिद्धांतांमधील त्रुटी दूर करण्यासाठी तसेच डार्क मॅटरचा वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या अन्य विचारांचा प्रस्ताव ठेवला आहे.

लियू यांच्या संशोधनानुसार आकाशगंगा व खगोलांना डार्क मॅटरने बांधून ठेवलेले नाही. त्याच्याऐवजी ब्रह्मांडातील 'टोपोलॉजिकल दोषां'चे पातळ, खोल स्तर असू शकतात, जे कोणत्याही वस्तुमानाशिवाय गुरुत्वाकर्षणाला जन्म देतात. लियू यांनी आईन्स्टाईन क्षेत्र समीकरणांचे आणखी एक उकल करण्याचा प्रयत्न केला आहे. ते अवकाश आणि काळाच्या वक्रतेला त्यांच्या आतील पदार्थांच्या उपस्थितीशी जोडते. आईन्स्टाईन यांनी सन 1915 मध्ये आपल्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतात म्हटले होते की, अवकाश आणि काळ हा (स्पेस अँड टाईम) ब्रह्मांडातील पदार्थांच्या गोळ्यांच्या आणि विकिरणांच्या धारांच्या आसपास फिरतात, जे त्यांच्या ऊर्जा आणि गतीवर अवलंबून असतात.

ही ऊर्जा आईन्स्टाईन यांचे प्रसिद्ध समीकरण 'ई इक्वल टू एम सी स्क्वेअर' मध्ये वस्तुमानाशी संबंधित आहे. एखाद्या वस्तूचे वस्तुमान त्याच्या ऊर्जेशी निगडित असते, जे अवकाश आणि काळाला वाकवते. स्पेस-टाईमच्या या कर्व्हेचरलाच आईन्स्टाईन यांनी गुरुत्वाकर्षण मानले होते. आईन्स्टाईन यांचा सिद्धांत हा न्यूटनच्या सतराव्या शतकातील अनुमानापेक्षा अधिक सुधारित आहे. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाला वस्तुमान असलेल्या दोन वस्तूंमधील एक बल मानले होते. थोडक्यात म्हणजे दोघांच्याही सिद्धांतात गुरुत्वाकर्षणाला वस्तुमानाशी घट्ट बांधले होते; पण लियू यांच्या म्हणण्यानुसार ही वस्तुस्थिती नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT