नवी दिल्ली : भारतीय आहारात मसूर डाळ एक सहज उपलब्ध, पौष्टिक आणि हलकी पचणारी प्रथिनांचा स्रोत मानली जाते. तिच्यात प्रथिने, लोह, फॉलिक अॅसिड, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि विविध जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात आढळतात. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी मसूर डाळ प्रथिनांचा उत्कृष्ट पर्याय आहे, असे तज्ज्ञ सांगतात.
मसूर डाळ शरीरातील रक्तनिर्मितीत मदत करणारे लोह पुरवते. त्यामुळे अशक्तपणा, थकवा किंवा हिमोग्लोबिन कमी असलेल्या व्यक्तींनी ती नियमितपणे खावी. मसूर डाळीतील फॉलिक अॅसिड गर्भवती महिलांसाठी विशेष उपयुक्त असून भ्रुणाच्या मेंदूच्या विकासात मदत करते. मसूर डाळीतील भरपूर फायबर पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता टाळते आणि पोट स्वच्छ ठेवते. यातील जटिल कार्बोहायड्रेटस् ऊर्जा हळूहळू आणि स्थिरपणे देतात. त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही.
त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही मसूर डाळ उपयुक्त ठरते. मसूर डाळ हृदयासाठीही फायदेशीर आहे. कारण, तिच्यात कोलेस्टेरॉल नसते आणि ती ‘हार्ट-फ्रेंडली’ पोषक द्रव्यांनी समृद्ध आहे. पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मसूर डाळ हा स्वस्त, पौष्टिक, पचायला सोपा आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर अन्न घटक आहे. तिचा नियमित आहारात समावेश केल्यास संपूर्ण शरीराच्या आरोग्याला मोठा लाभ होतो.