न्यूयॉर्क : मंगळ अवकाशातून पाहिल्यावर आणि वास्तवातही लालसर रंगाचा आहे. त्याच्या अशा अनोख्या रंगामुळे तो प्राचीन काळापासून मानवांसाठी आकर्षणाचा विषय राहिला आहे. आपल्या लालसर रंगामुळेच याला ‘लाल ग्रह’ असे म्हणतात. पण, प्रश्न उभा राहतो की, मंगळ ग्रहाला हा लाल रंग नक्की कसा मिळाला? चला, जाणून घेऊया.
सीएनएनच्या अहवालानुसार, वैज्ञानिकांचा विश्वास आहे की, मंगळ ग्रहाचा लालसर रंग त्याच्या पृष्ठभागावर असलेल्या गंजट रंगाच्या धुळीमुळे आहे. याला फेरीहायड्राईट असे म्हणतात. हीच धूळ मंगळ ग्रहाला त्याचा वैशिष्ट्यपूर्ण लाल रंग प्रदान करते. हे निष्कर्ष मंगळ ग्रहावर पाठवलेल्या अंतराळ यान आणि लँडरमधून मिळालेल्या डेटावर आधारित आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, पृथ्वीवरील रासायनिक प्रक्रियेप्रमाणेच, जेव्हा मंगळावरील खडकांमधील लोह पाण्याच्या किंवा मंगळाच्या वातावरणातील ऑक्सिजनच्या संपर्कात आले, तेव्हा त्याचा आयरन ऑक्साईड तयार झाला. त्यानंतर, मंगल ग्रहावरील वार्यांनी अब्जावधी वर्षांमध्ये या आयरन ऑक्साईडला ग्रहाच्या संपूर्ण पृष्ठभागावर पसरवले आणि ते सूक्ष्म धुळीत रूपांतरित झाले. त्यामुळे संपूर्ण मंगल ग्रहाला त्याचा लालसर रंग प्राप्त झाला. मंगळ ग्रहावर आता तरल स्वरूपातील पाणी नाही, त्यामुळे आधी वैज्ञानिकांचा असा समज होता की, या ग्रहाचा लालसर रंग हेमेटाइटसारख्या कोरड्या आयरन ऑक्साईडमुळे आहे. मात्र, उपग्रहांद्वारे मिळालेल्या नवीन डेटानुसार आणि प्रयोगशाळांतील संशोधनावरून असे दिसून आले आहे की, फेरीहायड्राईट ही अधिक योग्य व्याख्या असू शकते.