विश्वसंचार

मंगळावर एकेकाळी होती नदी, सरोवर

Arun Patil

वॉशिंग्टन : मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर एक हजार दिवस व्यतित केल्यानंतर आता 'नासा'च्या पर्सिव्हरन्स रोव्हरला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. रोव्हरने या लाल ग्रहावर एकेकाळी वाहणार्‍या नदीची आणि सरोवराचीही माहिती उजेडात आणली आहे. मंगळावर एकेकाळी वाहते पाणी होते, हे यापूर्वीही स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे प्राचीनकाळी मंगळावर सूक्ष्म जीवांच्या स्वरूपात का होईना जीवसृष्टीचे अस्तित्व होते का, हे पाहिले जात आहे. त्यासाठीच पर्सिव्हरन्स हे रोव्हर आणि 'इन्ज्युनिटी' हे छोटे हेलिकॉप्टर (रॉटरक्राफ्ट) 18 फेब्रुवारी 2021 मध्ये मंगळाच्या जेझेरो या विवरात उतरवण्यात आले होते.

मंगळावर उतरल्यापासून पर्सिव्हरन्सने आपले काम सुरू केले होते. त्यासाठी मंगळावरील अनेक ठिकाणचे नमुने या रोव्हरने गोळा केले आहेत. रोव्हरची विस्तृत 'ऑन-द-ग्राऊंड स्लीथिंग' वैज्ञानिकांना मंगळाच्या रहस्यमय भूतकाळाचे कोडे उलगडण्यासाठी मदत करीत आहे. यामधूनच आता मंगळावर एकेकाळी जीवसृष्टी होती का? हे स्पष्ट होणार आहे.

वैज्ञानिकांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अमेरिकन जियोफिजिकल युनियनच्या बैठकीत मंगळ ग्रहावर पर्सिव्हरन्स रोव्हरच्या प्रवासाची काही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रोव्हरने एका नदीच्या पात्राची किंवा खोर्‍याची पूर्ण तपासणी केली आहे. ही नदी अब्जावधी वर्षांपूर्वी वाहत होती व ती जेझेरो क्रेटरला भरणार्‍या सरोवराला मिळत होती. पर्सिव्हरन्सने संपूर्ण क्रेटर आणि डेल्टामधील वेगवेगळ्या ठिकाणांमधून 23 खडकांचे नमुनेही गोळा केले आहेत. प्रत्येक नमुना धातूच्या ट्यूबमध्ये सुरक्षित ठेवला आहे. भविष्यात हे नमुने पृथ्वीवर आणले जातील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT